मुंबई : मीरा-भाईंदरमधील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर भाजपच्याच नगरसेविकेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून मेहतांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने माजी आमदार नरेंद्र मेहता यांना पोलीस तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. नरेंद्र मेहता पोलीस तापासात सहकार्य करत असतील तर त्यांना 20 मार्चपर्यंत अटक करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा -'मुनगंटीवार के सपने' हे पुस्तक आम्ही लवकरच प्रकाशित करू'
तक्रारदार पीडित महिलेच्या जीवाला धोका असून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे विभागाच्या डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केला जावा, अशी मागणी पीडितेचे वकील रिझवान मर्चंट यांनी न्यायालयात केली. मात्र, मेहता यांच्या कुटुंबीयांकडून हे सर्व आरोप बिनबुडाचे असून राजकीय स्टंट असल्याचा आरोप करण्यात आला. नरेंद्र मेहता यांच्या याचिकेवर येत्या 20 मार्चला सुनावणी होणार असून यावर दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.