मुंबई- महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकता याव्यात म्हणून अरेबिक, रशियन, फ्रेंच आणि स्पॅनिंश या भाषा शिकवल्या जाणार आहेत. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकवण्याच्या मागणीला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अरेबिक, रशियन, फ्रेंच आणि स्पॅनिंश या भाषा शिकता येणार आहेत. यासंदर्भातील माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.
मुंबई महापालिका शाळांमधून गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांना एक वेळचे जेवणही योग्य प्रमाणात मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना पालिकेकडून मोफत शिक्षण दिले जाते. शाळेसाठी लागणारे कपडे, बूट, वह्या पुस्तके आदी वस्तू विद्यार्थ्यांना दिल्या जातात. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पालिकेकडून एसईपी, सेमी इंग्रजी, डिजिटल वर्ग व व्हर्च्युअल क्लासरूम आदी उपक्रम राबवण्यात आले आहेत.