मुंबई - मुंबईत रमजानचा पवित्र महिना हा फक्त मुस्लिम बांधवांसाठीच नव्हे तर येथील खवय्यांसाठीही महत्त्वाचा मानला जातो. रमजानमध्ये सायंकाळी जसे रोजे सोडण्यासाठी मुस्लिम बांधव येथे गर्दी करतात, तसेच जीभेचे चोचले पुरवण्यासाठी मुंबईकरांसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई, विरार आणि अगदी पुण्यापासून खाद्यप्रेमी येथे येऊन धडकतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सर्वच खाद्य रसिकांना या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी घेता आली नाही. मात्र, यंदा कोरोनावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईसह नजीकच्या शहरातील खवय्ये मंडळी लांबचा प्रवास करून मुंबईतील मोहम्मद अली मार्गावरील मिनरवा मशीदच्या गल्लीत फेरणी व जिलेबीसारख्या शाकाहारी पदार्थांसह तंदुरी व कबाबसारख्या मांसाहारी पदार्थांवर ताव मारण्यासाठी येत आहेत. या खाद्य भ्रमंतीचा ईटीव्ही भारतने केलेला हा विशेष रिपोर्ट...
'लजिज कबाब'च्या जोडीला 'फेरणी'ची लज्जत दररोज 40 हजार खाद्यप्रेमी देतात भेट- मुंबईतील प्रसिद्ध रमजान बाजार दोन वर्षांनंतर पुन्हा गजबजलेला आहे. मोहम्मद अली रोड, मिनारा मशीद आणि आजूबाजूच्या परिसरात पसरलेला हा बाजार या रमजानचा शुभमुहूर्तावर ग्राहकांना नवीन पदार्थांची मेजवानी देत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा बाजार बंद होता. मात्र राज्य सरकारने या महिन्यापासून सर्व निर्बंध हटविले आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी पहिल्यांदाच मोहम्मद अली रोडच्या बाजारात खवय्ये मंडळीसाठी सज्ज झाली आहे. मोहम्मद अली रोड, मिनारा मशीद, भेंडी बाजार आणि इतर गल्ल्यांमध्ये पसरलेल्या या बाजाराला दररोज सुमारे 40 हजार खाद्यप्रेमी भेट देतात आणि आठवड्याच्या शेवटी ही संख्या एक लाखाच्या वर जाते. येथे दिले जाणारे 90 टक्के पदार्थ हे मांसाहारी आहेत.
सर्वाधिक वर्दळीची एकमेव खाऊगल्ली -माशाअल्ला हॉटेलचे मालक अब्दुल रहेमान यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार भागात खाऊ गल्ली सुरू होऊ शकली नाही. तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच खाऊगल्ली सुरू झाली आहे. पूर्वी सारखे खाद्यप्रेमी आज भेट देत आहे. लज्जतदार कबाब टिक्का पान मिठाई या सारखे असंख्य प्रकार आणि असे अनेक पदार्थ आस्वाद घेत आहे. विशेष म्हणजे जगभरात मोहम्मद अली रोड भागातील खाऊ गल्ली सर्वाधिक व्यस्त खाऊ गल्लीमुळे ओळ्खली जाते. विशेष म्हणजे खाद्यप्रेमीसाठी खास रमजान स्पेशल पदार्थांची स्ट्रीट फूडच्या स्वरूपात चव चाखता येते. स्ट्रीट फूड प्रमाणेच येथे काही हॉटेल्स आणि रेस्टॉरेंटमध्ये इफ्तार स्पेशल पदार्थ खाण्यासाठी तयार करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक हॉटेलमध्ये आठवड्याचे सात दिवसही वेगवेगळ्या बिर्याणी खवय्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हेही वाचा- Waging war on Indian Muslims : भाजप द्वेष निर्माण करत भारतीय मुस्लिमांवर युद्ध छेडत आहे - ओवेसी यांचा आरोप
मोहम्मद अली रोडवर कुठे काय मिळते -
- चिनी ग्रील या हॉटेलमध्ये खास मोघलाई फूड प्रसिद्ध आहे. 'नल्ली निहाली', 'सीख कबाब' आणि कलेजी फ्राय हे पदार्थ तिथे प्रसिद्ध आहे.
- सुलेमान उस्मान मिठाईवाला हे प्रसिद्ध दुकान आहेत. ज्यांचे गोड पदार्थांवर प्रेम असेल तर त्यांनी सुलेमान उस्मान मिठाईवाला येथे भेट द्या. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज येथील गोड पदार्थांच्या प्रेमात आहे.
- शालिमार हॉटेल हे फालुदासाठी प्रसिद्ध आहेत. या हॉटेलमध्ये चिकन श्वार्मा, फालूदा, मोघलाई फूड ते फिरनी पर्यंत अनेक लज्जतदार पदार्थांची चव चाखण्यासाठी खाद्यप्रेमींची गर्दी असते.
- नूर मोहम्मदी हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. येथील 'चिकन संजूबाबा' आणि 'चिकन हाकिमी' खूप प्रसिद्ध आहेत.