मुंबई - राज्यात कोट्यवधींचा व्यापार करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या कामकाजात मराठीचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत होती. त्याची विविध कंपन्यांनी दखल घेत मराठीचा वापर सुरू केला आहे. आज फ्लिपकार्टने त्यांच्या अॅप, संकेतस्थळावर मराठीचा समावेश केला असून हटके ट्विट करून त्यांनी त्याची माहिती दिली आहे.
फ्लिपकार्टने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून कसं काय ! असे मराठीत ट्विट करून आमच्या अॅपवर आज नवीन काय आहे? ओळखा पाहू, असे म्हटले आहे. या ट्विटनंतर अनेकांनी ट्विटर कौतुक करत मनसेच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे. मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र यांनी ते ट्विट रिट्विट करून लय भारी असे म्हटले आहे. तर एकाने 'ठीक आहे मत देऊ नका, पण किमान या बदलाचे श्रेय मनसेला द्यायला लाजू नका', असे म्हटले आहे.
फ्लिपकार्ट या भारतातील ऐतद्देशीय बाजारपेठेने आपल्या मंचावर मराठी भाषा सादर करून आपल्या प्रादेशिक भाषेच्या सेवेला अधिक बळकटी दिली आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे.