मुंबई - महानगरपालिका मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी विविध ठिकाणी इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनची सोय करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी क्वरंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांना योग्य सेवा मिळत नसल्याचे समोर आले आहे. चेंबूर एम वेस्टमध्ये पालिकेचे क्वारंटाइन सेंटर आहे. यामध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या आणि माश्या सापडल्याचे समोर आले आहे. हे अन्न सेवन केल्यानंतर लहान मुलांना उलट्या झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे पालिका पुरवत असलेल्या सुविधेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच नागरिकांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्या आहेत.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानंतर नागरिकांना क्वारंटाइन करण्यात येते. शहरात ठिकठिकाणी बीएमसी वार्डात क्वारंटाइन सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये किमान चांगल्या गाद्या, बेड, सॅनिटायझर, हॅन्डवॉश आदी प्राथमिक गोष्टींची सोय असणे गरजेचे आहे. मात्र या क्वारंटाइन सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यानंतर विदारक वास्तव समोर आले आहे.