मुंबई -मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याने रोज 300 ते 400 रुग्णांची नोंद होत होती. 29 सप्टेंबर रोजी त्यात वाढ होऊन 527 तर आज रविवारी 3 ऑक्टोबर 570 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
4,714 अॅक्टिव्ह रुग्ण -
मुंबईत आज रविवारी 3 ऑक्टोबर रोजी 570 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 44 हजार 389 वर पोहचला आहे. आज 564 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 21 हजार 51 वर पोहचला आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 16 हजार 125 वर पोहचला आहे. मुंबईत सध्या 4 हजार 714 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1187 दिवस आहे.
हे ही वाचा -Corona Virus : रविवारी राज्यात 2,692 नवे रुग्ण, तर 2,716 कोरोनामुक्त, 41 रुग्णांचा मृत्यू
आतापर्यंत एक कोटी चाचण्या -
मुंबईत कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आज 41 हजार 44 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 1 कोटी 4 लाख 74 हजार 481 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आल्यावर चाळी आणि झोपडपट्ट्या सील केल्या जातात. सध्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत नसल्याने एकही झोपडपट्टी किंवा चाळी सील करण्यात आलेल्या नाहीत. 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यावर इमारती सील केल्या जातात, अशा 39 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
पालिका प्रशासन सज्ज -
गणेशोत्सवासाठी लाखो नागरिक कोकणात गेले होते. ते उत्सव संपल्यावर मुंबईत आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र रुग्णसंख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. पावसाळ्यात मुंबईमधून इतर राज्यात नागरिक जातात. पावसाळा संपल्यावर हे नागरिक पुन्हा मुंबईत येतील. त्यावेळी रुग्णसंख्या वाढू शकते. महापालिका त्यासाठी लक्ष ठेवून आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून पालिका प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.