मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरील बोईसर ते वणगाव स्थानकादरम्यान रेल्वेच्या ओव्हर हेड वायरच्या देखभाल दुरुस्तीकरीता पाच दिवस प्रत्येकी एक तासाचा शॉर्ट ब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा ब्लॉक आजपासून 28 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 वाजून 10 मिनिट ते 11 वाजून 10 मिनिटांपर्यत एका तासाचा असणार आहेत. या ब्लॉकमुळे काही गाड्यांचा वेळापत्रकावर परिणाम होणार तर काही रेल्वे गाडया अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.
या लोकल सेवा रद्द -
पश्चिम रेल्वेवरील बोईसर-वाणगाव दरम्यान आणि पालघर-वाणगाव विभागात तांत्रिक कामे करण्यासाठी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ओएचई वायरच्या देखभालीमुळे पश्चिम रेल्वेच्या काही उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यावर परिणाम होणार आहे. हा ब्लाॅक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सकाळी 10 वाजून 10 मिनिटे ते 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत असा एका तासाचा असणार आहे. या ब्लॉक कालावधीत 24 ते 28 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 8.56 वाजता चर्चगेट-डहाणू रोड लोकल केलवे रोड-डहाणू रोड दरम्यान अंशतः रद्द राहील. तर, सकाळी 10.05 वाजता डहाणू रोड-विरार लोकल डहाणू रोड-केळवे रोड दरम्यान अंशतः रद्द राहील. या लोकल सेवा रद्द केल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना अतिरिक्त थांबे दिले जातील.
ब्लॉकमुळे काही गाड्यांना अतिरिक्त थांबे-
- गाडी क्रमांक 12934 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेसला 24, 26, 27 आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी पालघर आणि विरार स्थानकावर अतिरिक्त थांबे असतील. 25 फेब्रुवारी 2022 रोजी या ट्रेनला बोईसर आणि विरार स्थानकावर अतिरिक्त थांबे असतील.
- गाडी क्रमांक 12990 अजमेर-दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसला 24, 26 आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी बोईसर आणि विरार स्थानकांवर अतिरिक्त थांबे असतील.
- गाडी क्रमांक 09159 वांद्रे टर्मिनस – वापी एक्स्प्रेसला 24 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान उमरोली स्टेशनवर अतिरिक्त थांबा असेल.
- गाडी क्रमांक 22952 गांधीधाम – वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसला 25 फेब्रुवारी 2022 रोजी पालघर आणि विरार स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.
- गाडी क्रमांक 12489 बिकानेर – दादर एक्स्प्रेसला 27 फेब्रुवारी रोजी बोईसर आणि विरार स्थानकांवर अतिरिक्त थांबा असेल.