मुंबई- मुंबई महापालिका व सत्ताधारी शिवसेनेचा कोस्टल रोड हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कोस्टल रोडला प्रकल्पामुळे आपल्या रोजीरोटीवर परिणाम होणार असल्याने वरळी कोळीवड्यातील मच्छिमारांनी आंदोलन उभारले आहे. यामुळे पालिकेने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे ही कारवाई उद्यापर्यंत (दि. 22) रोखली असून त्यावर उद्या (सोमवार) तोडगा काढला जाणार आहे.
कोस्टल रोडला मच्छिमारांचा विरोध -
मुंबई शहरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी वाहतूक कोंडी होत असल्याने कोस्टल रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. समुद्रामध्ये भुयारी आणि पुलामार्गे पश्चिम उपनगरात जाण्यासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोड उभारला जात आहे. समुद्रात उभारण्यात येणाऱ्या पिलरमुळे व्यवसायावर परिणाम होणार असल्याने या प्रकल्पाला मच्छिमारांकडून विरोध केला जात आहे. यासाठी मच्छिमारांनी आंदोलन उभारले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून सुरू असलेला मच्छीमारांचा संघर्ष आता पोलीस यंत्रणांच्या अनधिकृत सहायाने हाणून पाडण्याचा विडा मुंबई महानगरपालिकेने उचलेला असल्याचे वरळी कोळीवाड्यात दिसून आले. कोळीवाड्यात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.