मुंबई- अखेर कोरोनाग्रस्त रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू करण्यात आले आहेत. शनिवारी लीलावती या खासगी रुग्णालयात एका रुग्णावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले आहेत. तर रविवारी महापालिकेच्या सायन रुग्णालयात दोन तर सेव्हन-हिल रुग्णालयात तीन रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आता नायर रुग्णालयानेही यासाठी पुढाकार घेत पहिले प्लाझ्मा फेरेसिस मशीन बसवले आहे. त्यामुळे आता येत्या काळात मोठ्या संख्येने रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले जातील, अशी माहिती नायरचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.
कोरोनावर यशस्वी मात करत बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात अँटिबॉडी तयार होतात. त्यानुसार त्यांच्या रक्तातील फ्रॅक्शन घेत ते दुसऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांना दिले जातात. याने रुग्ण लवकर बरा होतो. या थेरपीला मान्यता मिळाल्यानंतर पालिकेने तत्काळ याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार बऱ्या झालेल्या रुग्णांशी संपर्क साधत, त्यांच्या रक्ताची तपासणी करुन अखेर 5 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी केली आहे.
सायनमध्ये दोन तर सेव्हनहिलमध्ये तीन रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्याआधी लीलावती रुग्णालयात पहिली, अशी थेरपी करण्यात आल्याची माहिती आहे. ही थेरपी गंभीर रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार असून यामुळे कोरोनाग्रस्त बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचा विश्वास आता व्यक्त होत आहे. तर कोविड 19 रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आलेल्या नायर रुग्णालयात पहिले फेरेसिस मशीन बसवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया वेगाने करत अधिकाधिक संख्येने रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. त्यानुसार लवकरच नायरमध्ये ही या उपचारांना सुरुवात होणार असल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली आहे.
काय आहे प्लाझ्मा थेरपी
कोरोना ग्रस्त रुग्णाच्या शरीरात कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी प्रतिपिंडे (अँटी-बॉडिज्) तयार होतात. त्यानुसार अशा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिपिंडे तयार झालेली असल्यास त्या रुग्णाला दाता म्हटले जाते. अशा दात्यांकडून त्यांच्या रक्तातील किमान 800 मिली लिटर प्लाझ्मा घेतला जाऊ शकतो. कोरोना बाधित व्यक्तीच्या उपचारासाठी अँटी-बॉडिज तयार करण्यासाठी 200 मिली लिटर प्लाझा उपयोगी पडतो. अशा पद्धतीने कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीपासून तीन ते चार रुग्णांवर प्लाझा थेरेपीनुसार उपचार केले जाऊ शकतात.