महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भारतातील पहिल्या पाच मजली पक्षी दालनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण - 'Free Bird Vihar' will be held in Ranibagh

बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरतण केले जात आहे. याचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारीला होणार आहे.

first-five-storey-bird-building-in-india-will-be-inaugurated-by-the-chief-minister
भारतातील पहिल्या पाच मजली पक्षी दालनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By

Published : Jan 25, 2020, 12:22 PM IST

मुंबई -बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील पहिले भव्यदिव्य असे पाच मजली 'मुक्त पक्षी विहार' दालन, तसेच प्राण्यासांठी पारदर्शकता असणाऱ्या काचेच्या भिंती असणारी अत्याधुनिक दालने उभारण्यात आली आहेत. या दालनांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारीला होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

भारतातील पहिल्या पाच मजली पक्षी दालनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पालिकेचे 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' मुंबईच्या पर्यटन नकाशावरील एक महत्त्वाचा मानबिंदू आहे. याच ठिकाणी सुमारे तीन वर्षांपूर्वी मार्च २०१७ मध्ये 'पेंग्विन'चे आगमन झाले आणि बागेत येणाऱ्या मुंबईकरांच्या व पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. आता याच राणीबागेत पेंग्विन पाठोपाठ देश विदेशातील १०० पक्षी जवळून न्याहाळण्याची संधी देणारे ५ मजली भव्यदिव्य असे 'मुक्त पक्षी विहार' दालन आणि बिबट्या, अस्वल, कोल्हा, तरस, कासव यांच्यासाठी पारदर्शकता असणाऱ्या काचेच्या भिंती असणाऱ्या अत्याधुनिक दालनांचे लोकार्पण होणार आहे. 'मुक्त पक्षी विहारा'त असलेल्या पुलावरून भ्रमंती करत पक्ष्यांना जवळून न्याहाळण्याची नागरिकांना मिळणारी संधी मिळणार आहे. बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा, कासव यांचा समावेश आहे. हे प्राणी अधिक जवळून व चांगल्या पद्धतीने बघता यावेत, यासाठी या दालनांच्या दर्शनी भागात वैशिष्ट्पूर्ण काच बसविण्यात आल्याने सेल्फी प्रेमींना देखील प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे लुटता येणार आहे.

मुक्त पक्षी विहार दालन -

भारतात पहिल्यांदाचा उभारण्यात आलेले 'मुक्त पक्षी विहार' दालन हे ४४ फुट उंचीचे असून जे साधारणपणे ५ मजली इमारती एवढ्या उंचीचे आहे, असे म्हणता येईल. तब्बल १८ हजार २३४ चौरस फूट क्षेत्रफळ असणाऱ्या या मुक्त पक्षी विहारात देश विदेशातील वेगवेगळ्या प्रजातींचे व प्रामुख्याने पाणथळ जागांच्या जवळ राहणारे सुमारे १०० छोटे-मोठे पक्षी आहेत. ज्यामध्ये बजरीगर, क्रौंच (Crane), हॅरॉननाईट, पेलीकन, करकोचा (स्टॉर्क), सारस, मकाव यासारख्या विविध पक्ष्यांचा समावेश आहे. या मुक्त विहारामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी झाडांवरती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची व्यवस्था असण्यासोबतच पक्ष्यांच्या घरट्यांचीही काळजी घेण्यात आली आहे. याच विहारामध्ये १६ फूट उंचीवरून वाहणारा नयनरम्य धबधबा आणि मनोहारी ओहोळ देखील आहे. या मुक्त पक्षी विहारामधील वातावरण व सभोवताल हा पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवसाशी मिळताजुळता असेल, याची काळजी घेऊन विकसित करण्यात आला आहे. या मुक्त पक्षी विहाराचे सगळ्यात महत्त्वाचे व आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे यात असणारा ९६ मीटर लांबीचा पादचारी पूल. वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वारे असणाऱ्या पुलावरून मुक्त पक्षी विहारात निर्धारित वेळी प्रवेश करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. ज्यामुळे पक्ष्यांना अधिक जवळून न्याहाळण्याची व त्यांचे छायाचित्रण करण्याची संधी असणार आहे.

हेही वाचा -मुंबई महापौर कार्यालय अन् बंगल्यातून प्लास्टिक बॉटल्स हद्दपार, काचेच्या बाटल्या वापरण्याचे निर्देश

बिबटे, अस्वल, तरस, कोल्हा यांची दालने -

कर्नाटाकातील मंगलौर येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेला बिबट्या व कोल्हा, म्हैसूर प्राणिसंग्रहालायातून आणलेला तरस, गुजरात मधील सुरत येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेले अस्वल; मायानगरी मुंबईत नव्यानेच आलेल्या या प्राण्यांसाठी चित्रपटातील सेटही फिके वाटतील, अशी मनमोहक व भव्यदिव्य दालने उभारण्यात आली आहेत. त्या-त्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्या अनुरुप दालने विकसित करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, बिबट्याला झाडावर चढायला आवडते, हे लक्षात घेऊन त्याच्या दालनात मोठे-मोठे वृक्ष असतील याची काळजी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर झाडांवरुन उडी मारण्याची बिबट्याची क्षमता लक्षात घेत झाडांच्या वर सुमारे १२ फूट उंचावरती वैशिष्ट्यपूर्ण जाळी सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आली आहे. दालनांच्या दर्शनी बाजूला असणाऱ्या काचेच्या भिंतींमुळे दालनात असणारे प्राणी नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना थेट बघता येऊ शकतात. तर सेल्फी प्रेमींना व छायाचित्रकारांना प्राण्यांची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे या ठिकाणी घेता येणार आहेत.

बिबट्यासाठी वेगळे दालन -

बिबट्यासाठी उभारण्यात आलेल्या दालनाचे क्षेत्रफळ २८ हजार ८७९ चौरस फूट एवढे आहे. अस्वलासाठी २२ हजार ६२५ चौरस फूट, तरसासाठी ९ हजार ४७२ चौरस फूट आणि कोल्ह्यासाठी ७ हजार २६५ चौरस फूट आकाराचे दालन उभारण्यात आले आहे.

हेही वाचा -मनसेची 'शिवराजमुद्रा', राज ठाकरेंच्या हस्ते नव्या झेंड्याचे अनावरण

जमिनीवरील व पाण्यातील कासवांसाठी स्वतंत्र दालन -

कासवासाठी राणीच्या बागेत स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. या दालनात पाण्यातील कासव अर्थात 'टर्टल' व जमिनीवरील कासव अर्थात 'टॉरटॉईज' हे एकाच ठिकाणी बघता येणार आहेत. सुमारे १ हजार २३४ चौरस फूट एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या या दालनात पाण्यातील कासवांसाठी एक छोटे तळे विकसित करण्यात आले आहे. तर जमिनीवरील कासवांसाठी छोटी घरटीही याठिकाणी आहेत. या दालनाच्या दर्शनी भागाच्या भिंती देखील वैशिष्ट्यपूर्ण काचेच्या आहेत. ज्यामुळे बच्चे कंपनीला अधिक जवळून चालणाऱ्या व पोहणाऱ्या कासवांना बघता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details