मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 आजपासून वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नसल्याने आणि कॊरोनाकाळात सुरक्षित प्रवास व्हावा यादृष्टीने वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान प्रवास करणारे मेट्रोला प्राधान्य देतील असे वाटत होते. पण, प्रत्यक्षात मात्र आज पहिल्या दिवशी मेट्रोला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)ने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 6727 प्रवाशांनी प्रवास केला आहे. 50 टक्के प्रवासी क्षमतेने मेट्रो धावत असताना आणि फेऱ्या निम्म्या केल्या असताना प्रवासी संख्या घटणार हे अपेक्षित होते. पण अपेक्षेपेक्षा ही खूपच कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा -केंद्राकडून मदत घेणे त्यामध्ये गैर काय? ती तर त्यांची जबाबदारीच - ठाकरे
कॊरोनाकाळात 18 तासऐवजी 12 तास मेट्रो धावत आहे. तर 400 फेऱ्याऐवजी 200 फेऱ्या मेट्रोच्या होणार आहेत. त्यानुसार आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 140 फेऱ्या झाल्या. तर या 140 फेऱ्याद्वारे 6727 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. तर रात्री साडे आठ वाजेपर्यंत हा आकडा 10 हजारांपर्यंत जाईल, असा विश्वासही एमएमओपीएलने व्यक्त केला आहे. पण साडेआठ वाजेपर्यंतचा आकडा उद्याच समजणार आहे.
हेही वाचा -'साहेब एवढ्यात काय होणार?'...नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
दरम्यान, लॉकडाऊनपूर्वी दररोज मेट्रोतून चार ते साडे चार लाख मुंबईकर प्रवास करत होते. आता अनलॉकमध्ये मेट्रो सुरू झाल्यास हजारोंच्या संख्येने मुंबईकर मेट्रोने प्रवास करतील असे वाटत होते. पण, आज पहिल्या दिवशी मेट्रो 1 ने कसाबसा 10 हजारांचा आकडा गाठेल असे चित्र आहे. आज पहिला दिवस असल्याने, मेट्रो सुरू झाल्याचे अनेकांना माहिती नसल्याने, अजूनही कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू नसल्याने तसेच शाळा-महाविद्यालये बंद असल्याने हा प्रतिसाद कमी असल्याचे म्हटले जात आहे. तर पुढील तीन-चार आठवड्यात प्रतिसाद वाढेल असा विश्वास एमएमओपीएलने व्यक्त केला आहे.