मुंबई -शहरातील गजबजलेल्या मस्जिद बंदर विभागातील राज गुजर या इमारतीच्या मीटर बॉक्सला आग लागली. या आगीमुळे घाबरलेल्या रहिवाशांना मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीद्वारे इमारतीच्या बाहेर काढले.
मस्जिद बंदर पूर्व येथे राज गौर ही तळ अधिक सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या मीटर बॉक्सला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे इमारतीत सर्वत्र धूर पसरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. इमारतीत धूर पसरल्याने अनेक रहिवाशी त्याठिकाणी अडकले होते. अडकलेले रहिवाशी खिडक्यांमधून आपल्याला बाहेर काढण्याची वाट बघत होते. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच खिडक्यांमध्ये अडकलेक्या रहिवाशांना शिड्यांचा उपयोग करत बाहेर काढले. ही आग छोटी असल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.