मुंबई- कांदिवली पश्चिम येथील ‘हंसा हेरिटेज’ इमारतीच्या १४ व्या मजल्यावर शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीच्या घटनेनंतर या इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंबई अग्निशमन दलाकडून या इमारतीच्या मालकाला, सोसायटीला नोटिस बजावणार असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली.
दोन जणांचा मृत्यू -
कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवर हंसा हेरिटेज ही पंधरा मजल्याची इमारत आहे. १४ व्या मजल्यावर दिवाळीसाठी लावलेल्या पणतीमुळे पडद्याने पेट घेऊन चौदाव्या मजल्यावर ही आग लागली, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमुळे घरातील एलपीजी सिलिंडरचाही स्फोट झाला. यामध्ये हॉल व किचनमध्ये असलेल्या दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. त्यांना कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आग प्रतिबंधक यंत्रणा बंद -
ही आग लागल्यानंतर इमारतीतील आग प्रतिबंधक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने आग विझवण्यात विलंब झाला. याठिकाणी यंत्रणा असली तरी ती कार्यान्वित नव्हती. ही आग मोठ्या स्वरुपाची नसली तरी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने आग त्वरीत विझवण्यात अडथळे आले. अग्निशमन दलाने बचावकार्य सुरु करून बेडरुमध्ये असलेल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढले. इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अग्निशमन दलाकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. हंसा हेरिटेज इमारतीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर या विभागातील सर्व इमारतींचा सर्व्हे करण्यात येणार आहे. तसेच आग लागल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी मॉक ड्रिल करण्याच्याही सूचना अग्निशमन दलाच्यावतीने केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
मंगळवारी महापौर पाहणी करून आढावा घेणार-
हंसा हेरिटेज इमारतीच्या आगीच्या घटनेची चौकशी केली जाणार आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास केला जातो आहे. मंगळवारी सकाळी महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर सुहास वाडकर या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहे. यावेळी स्थानिक नगरसेवक संबंधित वॉर्ड अधिकारी उपस्थित राहणार आहेत.