मुंबई - गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी किशोरी पेडणेकर, आमदार अमीन पटेल, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरं) सुरेश काकानी यांनी रात्री उशिरा भेट दिली. यावेळी त्यांनी पिरिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.
मागील चार महिन्यांमध्ये मुंबईत मोठ्या आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फक्त ऑक्टोबर महिन्यात मुंबईत पाच वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. यामध्ये शॉर्ट सर्किट होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
दादर बाजारपेठ
22 ऑक्टोबर 2020
दादर परिसरातील बाजारपेठेत सकाळी भीषण आग लागली होती. परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सकाळी सातच्या सुमारास दादरच्या आगर बाजारातील दुकानाला आग लागली होती. अग्निशमन दल आणि जेट्टीच्या मदतीने 30 मिनिटांत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु काही दुकाने जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पवई आयआयटी मार्केट
12 ऑक्टोबर 2020
पवई आयआयटी मार्केट जंक्शन समोर असणाऱ्या एका हॉटेलला भीषण आग लागली. यामध्ये हॉटेल पूर्णपणे जळून भस्मसात झाले. संबंधित घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पंजाब तडका हॉटेल हे आयआयटी मार्केट जंक्शन जवळच आहे. सकाळी हे हॉटेल बंद होते. आतून आगीचे लोळ बाहेर पडत असताना रहिवाश्यांमध्ये गोंधळ उडाला. काही वेळातच या आगीने रौद्ररुप धारण केले. यामुळे संपूर्ण जागेला आगीने वेढले आणि या दुर्घटनेत दुकान जळून खाक झाले.
मस्जिद बंदरचे कटलरी मार्केट
4 ऑक्टोबर 2020
होलसेल मार्केट म्हणून ओळख असलेल्या मस्जिद बंदर येथील कटलेरी मार्केटला सायंकाळी आग लागली होती. रात्री या आगीने भीषण रूप धारण केले. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर अग्निशमन दलाने या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली होती. मात्र, त्यानंतर आज सकाळी ही आग पुन्हा भडकली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून या आगीची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाचे 5 फायर इंजिन आणि 4 जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.
चेंबूर मार्केट
1 ऑक्टोबर 2020
हार्बर मार्गावरील चेंबूर स्थानकाजवळ असलेल्या मार्केटमधील एका दुकानाला पहाटे आग लागली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ जनता मार्केट आहे. या मार्केटमधील दुकानाला पहाटे 5.21 वाजता आग लागली. आग लागलेल्या ठिकाणापासून जवळच रेल्वे स्थानक व इतर दुकानं असल्याने अग्निशमन दलाने लेव्हल-2 च्या आगीची घोषणा करत 10 अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पाठवली.
फोर्ट परिसर, बाहुबली इमारत
26 ऑगस्ट 2020
फोर्ट येथील कावासाजी पटेल रोडवर असलेल्या बाहुबली इमारतीमद्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत एक जण 30 ते 35 टक्के भाजला. दीपक दिलदार असे आगीत भाजलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनेची माहिती होताच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती होताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 तर जम्बो वॉटरच्या 5 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले.