मुंबई :गोरेगाव येथे मंगळवारी लागलेल्या भीषण आगीमध्ये तब्बल ८०हून अधिक दुकाने जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव (पूर्व) मध्ये असलेल्या भंगारच्या गोदामांना अचानक आग लागली, आणि ही आग वेगाने परिसरात पसरली. याठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या १२ फायर इंजिन आणि ७ जंबो वॉटर टॅंकर उपलब्ध होते.
चार तासांनंतर आग काही प्रमाणात आटोक्यात..
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव (पूर्व) अरुण कुमार वैद्य मार्ग, खडकपाडा, सामना परिवार, रत्नागिरी हॉटेल, टारमेंट कंपनीच्या बाजूला वसलेल्या भंगार गोदामांना मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास आग लागली. १५ ते २० हजार चौरस फूट जागेतील भंगार मालाची गोदामे, झोपड्या, कारपेंटरची दुकाने आदींना आग लागली. ही आग हळूहळू पसरली व भडकली. भीषण आग व काळ्या धुराचे लोट यामुळे त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला हटवले.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र आगीची भीषणता वाढल्याने सायंकाळी ७.१७ वाजता आगीचा स्तर -२ झाल्याचे घोषित करण्यात आले. तर आणखीन अर्ध्या तासात आग आणखीन भडकल्याने सायंकाळी ७.४६ वाजताच्या सुमारास आगीचा स्तर -३ झाल्याचे घोषित करण्यात आला. ही आग पूर्णपणे विझली नसली, तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी चौधरी यांनी दिली.