मुंबई - कुलाबा येथील ताज महल हॉटेलजवळील ‘चर्चिल चेंबर’ या इमारतीला आज दुपारी आग लागली. या आगीत काही रहिवाशी अडकले होते. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झाला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही. या इमारतीमधून 9 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
मुंबईतील ताज हॉटेलजवळील 'चर्चिल चेंबर' इमारतीला आग; एकाचा होरपळून मृत्यू मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये श्याम अय्यर (55 वर्ष) यांचा जिटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जखमी युसूफ पूनावाला (50 वर्ष) यांच्यावर बॉम्बे रूग्णालयात उपाचार सुरू आहेत.
आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ताज महल व डिप्लोमॅट हॉटेलच्या बाजूला असलेल्या 'चर्चिल चेंबर' या 4 मजली इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे अग्निशमन दलाने उंच शिड्यांच्या सहाय्याने इमारतीमध्ये प्रवेश करून रहिवाशांना बाहेर काढले आहे. या ठिकाणी गंभीर परिस्थिती असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.
रविवारमुळे वाचले अनेकांचे प्राण -
कुलाबा परिसरात रोज वाहतूक कोंडी असते. सोमवार ते शनिवारी या भागात वाहतूक समस्या असते. मात्र, आज रविवार असल्याने रस्त्यावर कमी वाहने होती. त्यामुळे अग्निशमन दलाची वाहने वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकली.