मुंबई - बीड जिल्ह्यातील वक्फ मंडळाच्या जमिनीच्या (Beed Waqf Land Scam) अपहाराप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल (FIR) केल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी विधान परिषदेत दिली. तसेच विविध पोलीस ठाण्यात याप्रकरणी ५ गुन्हे नोंदवण्यात आल्याचे ते म्हणाले.
चौकशीसाठी एसआयटी नेमा- विनायक मेटे
बीड जिल्ह्यातील वक्फ मंडळ आणि देवस्थान (Beed Waqf Land Scam) जमिनीच्या खरेदी - विक्रीमध्ये गैरव्यवहार झाला आहे. महसूल अधिकाऱ्यांसह १५ जणांवर गुन्हा दाखल (FIR) आहे. गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी नेमून शासनाने चौकशी करावी, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली आहे.
चौकशी करण्यासाठी विशेष पोलीस पथक नियुक्त -
वक्फ मंडळाच्या जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पोलीस पथक नियुक्त केले आहे. मागील विधीमंडळात यासंदर्भातील घोषणा केली होती. सध्या हे प्रकरण चौकशीसाठी महसूल विभागाकडे आहे. परंतु, आरोपींमध्ये उपजिल्हाधिकार्यांचाही समावेश आहे, हे खरे आहे. या प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या ५ गुन्ह्यांपैकी ३ प्रकरणे विशेष पोलीस पथकाकडे तपासणीसाठी दिली आहेत. उर्वरित २ प्रकरणांची चौकशी स्थानिक गुन्हे तपास पथकाद्वारे सुरु आहे. आवश्यकता वाटल्यास या प्रकरणांचा तपास विशेष पोलीस पथकाकडे वर्ग केला जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.