ठाणे- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबईत खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी ठाण्यातही त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. धमकावणे आणि खंडणी प्रकरणासह अनेक कलमांन्वये त्यांच्या विरोधात परमबीर आणि अन्य वरिष्ठ पोलिसांवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल-
मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यावर एका बांधकाम व्यावसायिकाने १५ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात देखील परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक शरद अग्रवाल यांनी गुन्हा दाखल केला आहे. परमबीरसिंह यांनी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि बळजबरीने जमीन नावावर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. त्या आरोपानुसार भादंवि ३८४, ३८५,३८८,३८९,४२०,३६४ अ, ३४ १२० ब यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंग यांच्यासह संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर व मणेरे असे सह आरोपीविरोधात ही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाण्यात आज गुन्हा दाखल होण्यापूर्वी गुरुवारी देखील मुंबईत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपातून मुक्त करून देण्याच्या मोबदल्यात खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यासहित सात जणांविरुध्द मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यातील एक आरोपी हा शिवसेना आमदार गीता जैन यांचा सख्खा भाऊ आहे.
मीरा भाईंदर शहरातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार त्याच्यावर असलेल्या आरोपातून मुक्त करण्याकरिता माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी १५ कोटीची मागणी केली होती. त्यानुसार मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये एकूण आठ जणांची नावे आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे.