मुंबई- महापालिकेचे गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय धोकादायक असल्याचे सांगून १७ महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले होते. या रुग्णालयाची दुरुस्तीसाठी किंवा नव्याने बांधकाम करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नसल्याने या रुग्णालयाची इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे गोरेगाव ते मालाड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
गोरेगाव येथे पालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय आहे. १९९५ - १९९७ दरम्यान ही इमारत बांधून येथे रुग्णालय सुरू करण्यात आले होते. या रुग्णालयामुळे गोरेगाव ते मालाड दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत होती. मात्र, १७ महिन्यापूर्वी या रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचे सांगत रुग्णालय बंद करण्यात आले. रुग्णालय बंद केल्याने येथील स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत सिद्धार्थ रुग्णालय बचाव संघर्ष समिती स्थापन केली. समितीच्या माध्यमातून वर्षभरापासून आंदोलन, जनजागृती, माहिती अधिकाराखाली रुग्णालयासंबंधी माहिती मागवणे, पालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, पी- दक्षिण विभाग, नगरसेवक यांना निवेदने देणे, अशी चळवळ चालू ठेवली.