मुंबई -एन 95 मास्कची वाढती मागणी लक्षात घेता हे मास्क अव्वाच्या सव्वा किंमतीत विकल्या जात आहेत. मात्र आता त्याला आळा बसणार आहे. कारण भारतातल्या चार मोठ्या कंपन्यांनी एन 95 मास्कच्या किंमती 47 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (एनपीपीए) च्या निर्देशानंतर या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे आता खासगी डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील ग्राहकांसह सर्वसामान्य ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे.
अखेर एन 95 मास्कच्या किंमती 47 टक्क्यांनी कमी - सर्वसामान्य ग्राहकांनाही दिलासा
भारतातल्या चार मोठ्या कंपन्यांनी एन 95 मास्कच्या किंमती 47 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण ( एनपीपीए) च्या निर्देशानंतर या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे आता खासगी डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील ग्राहकांसह सर्वसामान्य ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर-नर्स तसेच कोरोना वॉर्डमधील रुग्णांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाला एन-95 मास्क वापरणे गरजेचे आहे. तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी एन 95 मास्कच हवा, अशी समजूत सर्वसामान्यांची झाली आहे. त्यामुळे याची मागणी प्रचंड वाढली आहे. याचा फायदा घेत कंपन्यापासून औषध विक्रेते अव्वाच्या सव्वा किमतीत एन-95 मास्क विकत आहेत. तर याची टंचाई ही आहे. एन 95 मास्कच्या किमती निश्चित नसल्याने ही लूट सुरू होती. ही बाब लक्षात घेत अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) महाराष्ट्रने एन 95 मास्कच्या किमती निश्चित करण्याची मागणी एनपीपीएकडे केली होती. त्यानुसार एनपीपीएने या मास्कचा समावेश अत्यावश्यक वस्तूमध्ये करत 25 मे रोजी याच्या किमती 47 टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता अखेर चार बड्या कंपन्यानी प्रत्यक्षात किमती 47 टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
सेफ्टी अँड हेल्थ प्रा. लि., मॅग्नम हेल्थ अँड सेफ्टी, यश केअर लाईफ सायन्सेस आणि जोसेफ लेस्ली या कंपन्यानी एन 95 मास्कच्या किंमती कमी केल्याची माहिती एफडीएतील एका अधिकाऱ्याने दिली आहे. 160 रुपयांचे एन 95 मास्क आता 95 रुपयात तर 175 च्या मास्कची किमत 105 रुपये अशी झाली आहे. त्याचवेळी 250 च्या मास्कची किंमत 160 रु, 200 रुपयाच्या मास्कची 130 रुपये अशी झाली आहे. बाजारात विविध प्रकारचे एन 95 मास्क असून सर्वच प्रकारच्या मास्कच्या किंमती कमी झाल्या आहेत. याचा फायदा आता खासगी डॉक्टर-नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान एन 95 मास्कचा वापर सर्वसामान्य लोकांनी करू नये असे आवाहन एफडीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे. जे रुग्णांवर उपचार करता, जे सतत रुग्णांच्या संपर्कात असतात त्यांनीच याचा वापर करावा. इतरांनी रुमाल वा कापडी मास्कचाच वापर करणे योग्य आहे. एन 95 मास्क विनाकारण खरेदी करत त्याची योग्य विल्हेवाट सर्वसामान्य लावताना दिसत नाहीत. रस्त्यावर हे मास्क पडलेले दिसतात. त्यामुळे कॊरोना आणि इतर आजारांचा संसर्ग वाढण्याची भीती आहे, असे म्हणत एफडीएने हे आवाहन केले आहे. तर एनपीपीएने निर्धारित केलेल्या किंमतीतच एन 95 मस्कची विक्री विक्रेत्यांकडून केली जात आहे ना यावर एफडीए बारीक लक्ष ठेवून असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.