महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अर्थसंकल्पाच्या रांगोळीत विकासाचे रंग भरा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचा अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी आहे. हे ठिपके म्हणजे राज्यातील मतदारसंघ असून ते जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होईल, त्यात आपल्याला विकासाचे रंग भरण्याचे काम करायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Dont make false promises says Uddhav Thackeray
विकासाचे रंग प्रतिक्रिया उद्धव ठाकरे

By

Published : Oct 5, 2021, 4:18 PM IST

मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी आहे. हे ठिपके म्हणजे राज्यातील मतदारसंघ असून ते जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होईल, त्यात आपल्याला विकासाचे रंग भरण्याचे काम करायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आमदारांसाठी 'राज्याचा अर्थसंकल्प - माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात' ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

हेही वाचा -आजपासून करता येणार राज्यसेवा 2021 परीक्षेकरीता अर्ज; जाणून घ्या, कोणत्या विभागात आहेत किती जागा?

नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सर्वस्व हरवलेल्यांना धीर देण्याचे काम करावे लागत आहे. हे करताना खोटी आश्वासने देता कामा नये, मी हेच करतो आहे. भले ही माझ्यावर टीका झाली तरी मला त्याची पर्वा नाही, अशा शब्दांत विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी खडसावले.

विकासाचे रंग भरा

कोरोना संसर्गानंतर गेल्या दीड वर्षातील पहिलाच प्रशिक्षण कार्यक्रम आहे. मंगळवारी राज्यातील शाळेची घंटा वाजली. आज आपली शाळा विधानमंडळात भरली, याचा आनंद असून आपण आजही विद्यार्थी आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मी विधान परिषदेचा आमदार असून संपूर्ण राज्य माझा मतदारसंघ आहे, त्यामुळे मला संपूर्ण राज्याचा विचार करावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून हे ठिपके म्हणजे राज्यातील मतदारसंघ. हे मतदारसंघ जोडले तर, जी सुंदर रांगोळी तयार होईल त्यात विकासाचे रंग भरण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यातून राज्य विकासाची सुंदर रांगोळी रंगणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सभागृहातील हमरीतुमरीचे भान ठेवा

अर्थसंकल्प समजून घेऊन त्यावर नेमके बोलणे, हे काम अधिक कठीण आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेली धोरणे, योजना विकासकामे यातून माझ्या मतदारसंघासाठी काय मिळवता येईल, हे पाहणे, ते मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम प्रत्येक आमदारांनी केले पाहिजे. पहिल्यांदा विधानसभेत आलो तेव्हा मला सभागृहाचे दोन भाग दिसले. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष. हे दोन भाग सतत सोबत असतात, असे नाही, पण महाराष्ट्रातील मतदार विधानसभेच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात. ज्या आमदाराला मतदान केले तो माझा लोकप्रतिनिधी माझे किती प्रश्न, माझ्या किती अडचणी विधानसभेत मांडतो याकडे त्याचे लक्ष असते, आपण हे लक्षात घेतले पाहिजे. माझ्या आयुष्यात कोणते बदल यातून घडतात, कोणते निर्णय येथे होतात, हेही मतदार पाहत असतो. आज सभागृहात कुठल्या पातळीवर जाऊन हमरीतुमरी करायची, याचा लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. राज्याला हे शोभत नाही, प्रत्यकाने याची काळजी घ्यायला हवी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आरोग्य सुविधांची काळजी घेण्याची गरज

महाराष्ट्राला थोर साधू, संत आणि समाज सुधारकांची परंपरा आहे. ही परंपरा जपणार हे सर्वोच्च सभागृह. ती परंपरा जपली पाहिजे. शिक्षण, आरोग्याकडे खूप दुर्लक्ष झाले. साथ आणि आपत्ती आल्यानंतर सर्वांची दाणादाण उडाली. जगात कुठेही नसतील इतक्या वेगाने आणि संख्येने आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, ही प्रार्थना, पण त्याला प्रयत्नांचे बळ हवे आहे. तिसरी लाट येणार नसली तरी उभे केलेल्या आरोग्य सुविधांची काळजी घेण्याची गरज, त्या सुविधा योग्यप्रकारे चालू रहातील हे पाहणे महत्वाचे आहे. आपले प्राधान्य जीव वाचवण्याला आहे, त्यामुळेच मागील दोन वर्षांत आरोग्य क्षेत्राला अधिक निधी द्यायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्याला या गुलाबाचे काटे टोचले

आपत्तीच्या प्रसंगी शासनाकडून वाढीव मदत दिली. पण, राज्य सतत आपत्तीच्या प्रसंगांना सामोरे जात आहे. निसर्ग, तौक्ते, गुलाब एकापाठोपाठ एक संकट येत आहेत. आता आलेले गुलाब वादळ पश्चिम किनाऱ्यावर धडकणार नाही, असे म्हणत असताना राज्याला या गुलाबाचे काटे टोचले आणि अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले. आपत्तीच्या या दरडी राज्यावर, राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर कोसळत आहेत, त्यातून मार्ग काढत आपण पुढे जात आहोत. आपण प्रत्येक आपत्तीत तत्काळची मदत करतो आपण नुकसान कधीही भरून देऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

आपत्तीग्रस्तांना धीर

आपत्तीच्या प्रसंगात कोविड नियम पाळून मदत, लोकांचे स्थलांतर, जेवण निवाऱ्याची सोय, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. आपत्तीत सर्वस्व हरवलेल्यांना धीर देण्याचे काम करावे लागते. हे करताना खोटी आश्वासने देता कामा नये. मी हेच करतो, भले ही माझ्यावर टीका होत असेल, मला त्याची पर्वा नाही. आज प्रगत यंत्रणा आपल्या हाताशी आहे, माध्यमे ही सगळ्या गोष्टी दाखवतात, तरी आपत्तीग्रस्तांना धीर देण्यासाठी, आढावा घेऊन मदतीचा अंदाज घेण्यासाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विचारांची खोली आपण कधी अभ्यासणार

अर्थसंकल्पातील बाबी ठरवल्याप्रमाणे अंमलात आणण्याची गरज आहे. आमदार मतदारसंघात अनेक घोषणा करतात, त्या प्रत्यक्षात आणता आल्या नाही, तर लोक घरी पाठवतात. त्यामुळे, शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मतदारसंघाला मिळवण्याचे प्रयत्न आवश्यक आहे. विधानमंडळ सभागृहात बोलवयाच्या संसदीय भाषेच्या प्रशिक्षणाचीही गरज आहे. अलीकडच्या काळात आलेला उथळपणा दूर करून विचारांची खोली आपण कधी अभ्यासणार की नाही? बोललेल्या प्रत्येक शब्दाला अर्थ असावा, विधानमंडळात बोलण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, त्याची माती होणार नाही, हे समजण्याची गरज असल्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा -मुंबईत अंमली पदार्थांची सर्रास तस्करी, महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय? - अतुल भातखळकर

ABOUT THE AUTHOR

...view details