कंगना रणौत विरोधात गोरेगावच्या वनराई पोलीस स्थानकात तक्रार दाखल - bollywood latest news
कंगनाच्या या ट्विटने मराठी अस्मितेला धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील पोलिसांना कमी लेखून या शहराची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरसोबत करन तिने महाराष्ट्राच्या मातीचा अपमान केला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
मुंबई- अभिनेत्री कंगना रणौत हिच्या विरोधात मुंबईतील गोरेगावमधील वनराई पोलीस स्थानकात प्राथमिक तक्रार दाखल झाली आहे. आदित्य सरफरे नावाचा एका सर्वसामान्य मुंबईकराने कंगना विरोधात ही तक्रार दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसात कंगनाने मुंबई पोलिसांची बदनामी करणारे तसेच मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणारे काही ट्विट्स तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून पोस्ट केले होते. या ट्विटद्वारे तिने सत्ताधारी शिवसेना पक्षाला टार्गेट करून हिम्मत असेल तर मला मुंबईत येण्यापासून रोखून दाखवा असे आव्हान दिले होते. यातले राजकारण सोडले तरीही मुंबईत येऊन, मुंबईत काम करून, याच शहराने यशाच्या शिखरावर नेल्यानंतर त्याच शहराला बदनाम करणे चुकीचे आहे. कंगनाच्या या ट्विटने मराठी अस्मितेला धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील पोलिसांना कमी लेखून या शहराची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरसोबत करन तिने महाराष्ट्राच्या मातीचा अपमान केला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
आदित्य सरफरे यांनी मुंबई अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील कोल्हे यांच्याकडे आपला तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर तो गोरेगावच्या वनराई पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला आहे. या तक्रारीबाबत अजून कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नसली तरीही त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होणार आहे. आता या तक्रारीवरून तिच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही ते येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल.