मुंबई - शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना काळात मिरवणूक काढण्यास परवानगी नसताना मिरवणूक काढून कोरोनाचे नियम तोडल्याप्रकरणी अबू असीम आझमींसह 18 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आमदार अबू आझमी व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? -
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्तांनी मोठ्या जल्लोषात रथावरून त्यांची मिरवणूक काढली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी कोरोनानियमांचा फज्जा उडवत कोरोना नियमांची पायमल्ली केली होती. तसेच, यावेळी आमदार अबू आझमी आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार देखील हातामध्ये घेतली होती. या प्रकरणी त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८, २६९ सह कलम ११ महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना २०२० सह कलम ४, २५ भाहका. सह ३७ (अ) (१), १३५ मपोका. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.