मुंबई -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यामुळे एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत वानखेडे यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲड. कनिष्ठ जयंत यांनी केली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र -
किरण गोसावी याच्या बॉडीगार्डने (ता. २४ ऑक्टोबर) सकाळी क्रूझ ड्रग्जप्रकरणी शाहरूख खानच्या मॅनेजरकडून ५० लाख रुपये घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना ॲड. कनिष्क जयंत यांनी या मागणी संदर्भातील पत्र लिहिले आहे. त्या पत्रात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. या सहा जणांवर शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचे अपहरण करणे आणि खंडणी मागणे या प्रकरणात फिर्याद नोंदवण्याची मागणी पोलीस आयुक्त नगराळे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. एनसाबीचे अधिकारी समीर वानखेडेंसह ६ जणांवर शाहरूख खानच्या मुलाचे अपहरण करून खोटा गुन्हा दाखल करून अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार ॲड. कनिष्ठ जयंत यांनी माता रमाबाई पोलीस ठाणे, यलोगेट पोलीस ठाणे व स्वत: मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंसह अन्य जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हटले आहे तक्रारीत -
के. पी. गोसावी, मनीष भानुशाली या प्रमुख आरोपीसह ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या विरोधात कॉर्डेलिया क्रुज संदर्भात गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने पूर्णतः खोटे प्रकरण गुन्हेगारी हेतू मनात ठेवून पूर्णत्वास नेण्यासंदर्भात केलेल्या गुन्हेगारी कृत्यांविरोधात एफ.आय.आर. नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार करण्याथ आली आहे. के.पी. गोसावी, मनीष भानुशाली यांच्या विरोधात लोकसेवक असल्याची बतावणी करून तोतयागिरी करणे, फक्त लोकसेवकाला असलेल्या अधिकारांचा गुन्हेगारी हेतू मनात ठेऊन तसेच बलप्रयोग करून खंडणी उकळण्याचा हेतू मनात ठेऊन आर्यन शाहरुख खान याची फसवणूक करून व त्यानंतर त्याचे अपहरण करून प्रचलीत फौजदारी दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केलेल्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे. आर्यनला एनसीबीने पकडल्यानंतर त्याच रात्री गोसावी व सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले होते. त्यावेळी त्यांच्या पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर सकाळी एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा खुलासा बॉडीगार्ड साईलने आज सकाळी केला होता. त्यानंतर एनसीबीकडे दुपारी पत्रक काढून खुलासा करण्यात आला होता. वानखेडे यांनी कार्डिलिया क्रूझवर छापेमारी करत आर्यनसह काही जणांना अटक केली होती. यावेळी त्यांनी ज्या पंचाच्या सह्या घेतल्या आहेत. त्यामध्ये गोसावीसह प्रभाकरचेही नाव होते.
हेही वाचा -समीर वानखडेसंदर्भात नवाब मलिकांचे नवे ट्वीट; म्हणाले 'फर्जिवाडा इथूनच सुरु होतो'