महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

टिपू सुलतान वाद :... तर महापौरांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू; आमदार अमित साटम यांचा इशारा

प्रभाग क्रमांक १३६ येथील समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांनी गोवंडी येथील महापालिकेच्या उद्यानास 'टिपु सुलतान उद्यान' असे नांव देण्याची विनंती ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.

By

Published : Jul 17, 2021, 5:14 PM IST

Updated : Jul 17, 2021, 5:24 PM IST

MLA Ameet Satam
आमदार अमित साटम

मुंबई -गोवंडी येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेने केली आहे. त्याला पालिका प्रशासनाने होकार दर्शवला आहे. मात्र या नावाला भाजपाने विरोध केला आहे. याआधीही रस्त्याला टिपू सुलतान यांचे नाव दिले तेव्हा भाजपाने विरोध का केला नाही? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. भाजपाच्या सदस्यांनी हे नाव द्यायला अनुमोदन दिल्याचे महापौरांनी म्हटले आहे. यावर भाजपाचे माजी नगरसेवक व सध्याचे आमदार अमित साटम यांनी आपण अनुमोदन दिल्याचे पत्र दाखवावे अन्यथा महापौरांविरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया देताना भाजप आमदार अमित साटम

काय आहे नेमके प्रकरण?

प्रभाग क्रमांक १३६ येथील समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांनी गोवंडी येथील महापालिकेच्या उद्यानास 'टिपु सुलतान उद्यान' असे नांव देण्याची विनंती ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या नामकरणासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने नामकरणाची शिफारस केलेली आहे. टिपु सुलतान हे भारताचे क्रांती सेनानी होते. योग्य शासक, महान योद्धा, विद्वान असे त्यांचे वर्णन केलेले आहे. भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी पहिला प्रयत्न केला होता असे समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या विभागात ज्या समुदायातील लोक राहतात त्यांच्या समुदायातील नावे दिली जातात. भारतात आपण सर्व बंधू भावाने राहत आहोत यामुळे एखाद्या नावाला विरोध करणे योग्य नाही असे सिद्दीकी यांनी म्हटले आहे. या उद्यानाला नाव देण्यासाठी पालिका प्रशासनाने होकारार्थी अभिप्राय देण्यात आला आहे. टिपू सुलतान यांचे नाव देण्यास हिंदू जनजागृती समितीने विरोध दर्शवला आहे. त्यानंतर हा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत आला असता त्याला भाजपाने विरोध केला आहे. याबाबत सदर गार्डनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या आधीही याच विभागात रस्त्याला टिपू सुलतान यांचे नाव दिले आहे. यामुळे पालिकेच्या नियमानुसार उद्यानाला नाव देता येईल का याची पडताळणी करण्यासाठी प्रस्ताव फेर विचारसाठी प्रशासनाकडे परत पाठवला आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

भाजपा नगरसेवकाचे अनुमोदन -

टिपू सुलतान यांचे नाव गोवंडी येथील रस्त्याला देण्यात आले आहे. या नाव देण्याच्या प्रस्तावाला तत्कालीन भाजपाचे नगरसेवक अमित साटम यांनी अनुमोदन दिले आहे. डिसेंबर २०१३ चा प्रस्ताव आहे. त्यावेळी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही मित्र पक्ष सत्तेत युती म्हणून एकत्र होते. माजी अपक्ष नगरसेवक सिराज सिद्दीकी यांनी रस्त्याला नाव देण्याचा प्रस्ताव आणला होता.

महापौरांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा -

महापौरांनी भाजपच्या नगरसेवकाने अनुमोदन दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. याचा भाजपाचे आमदार अमित साटम यांनी निषेध केला आहे. मी नगरसेवक असताना कधीही स्थापत्य समिती उपनगरचा कधीच सदस्य नव्हतो. गोवंडी येथील रस्त्याला नाव देण्याच्या प्रस्तावाला मी अनुमोदन दिल्याचे पत्र महापौरांनी सात दिवसात दाखवावे अन्यथा त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करून 50 कोटीं रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा आमदार अमित साटम यांनी दिला आहे.

Last Updated : Jul 17, 2021, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details