महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई : कोरोना रुग्णांना बेड्सची विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करा; पालिका आयुक्तांचे निर्देश - मुंबई महानगरपालिका बातमी

रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचा फायदा घेऊन काही लोकांनी बेड्स देण्याच्या बदल्यात पैसे घेण्याचा धंदा सुरू केला आहे. याची माहिती मिळताच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी अशा लोकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

mumbai municipal commissioner
मुंबई : कोरोना रुग्णांना बेड्सची विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करा; पालिका आयुक्तांचे निर्देश

By

Published : May 13, 2021, 2:56 AM IST

मुंबई -मुंबईत कोरोना रुग्णांवर रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये उपचार केले जातात. रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचा फायदा घेऊन काही लोकांनी बेड्स देण्याच्या बदल्यात पैसे घेण्याचा धंदा सुरू केला आहे. याची माहिती मिळताच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी अशा लोकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांमधील बेड्स वितरणाबाबत अत्यंत काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित सर्व अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महापालिकेला माहिती द्या -

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. त्यांचे वितरण अत्यंत पारदर्शक पद्धतीने नियंत्रण कक्षांद्वारे केले जात आहे. या विषयीची सर्व माहिती संबंधित संगणकीय प्रणालीच्या डॅशबोर्डवर उपलब्ध असून ही नियमितपणे अद्ययावत होत असते. तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच बेडची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना किंवा महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

१० हजार ८२९ बेड्स रिक्त -

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सध्या एकूण २२ हजार ५६४ बेड्स असून यापैकी १० हजार ८२९ बेड्स सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड इत्यादी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव आहेत.

वॉर रूमद्वारे बेडसचे वितरण -

कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध बेडसचे वितरण हे बृहन्मुंबई महापालिकेच्या २४ विभागस्तरीय वॉर्ड वाॅररूमद्वारे करण्यात येते. तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार ज्यांना रुग्णालयांमध्ये रुग्णशय्येची आवश्यकता आहे, त्यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा व नियंत्रण कक्षाद्वारेच बेड वितरण करवून घ्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

हेही वाचा - मुंबई महापालिकेकडून १ कोटी लसींसाठी 'ग्लोबल टेंडर' जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details