महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आरे'मधील झाडे रात्री तोडली, 'मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा' - File a homicide fir in case of aare tree cutting issue says bmc Standing Committee

मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील झाडे रात्री तोडली आहेत. याचे पडसाद मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत उमटले. रात्री झाडे तोडण्यात आल्याच्या प्रकाराचा भाजप सोडता सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केला. याप्रकरणी मेट्रोवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

आरे

By

Published : Oct 5, 2019, 7:25 PM IST

मुंबई- मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील झाडे रात्री तोडली आहेत. याचे पडसाद मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत उमटले. रात्री झाडे तोडण्यात आल्याच्या प्रकाराचा भाजप सोडता सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केला. याप्रकरणी मेट्रोवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान, याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिला.

विरोधी पक्ष नेते रवी राजा

हेही वाचा - 'आरे'मधील वृक्षतोड प्रकरण : 38 जणांना अटक

मुंबईत मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. त्यासाठी गोरेगांव आरेमध्ये कारशेड उभारले जात आहे. त्यासाठी २७०० झाडे कापली जाणार आहेत. झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला नुकतीच पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. याविरोधात काही संस्था उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्याबाबतची याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. याचिका फेटाळताच मेट्रो (एमआरसीएल)कडून रात्री अंधारात झाडांची कत्तल करण्यात आली. याला पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी जोरदार विरोध केला. यामुळे पोलिसांनी अनेकांना अटक केली.

राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव

हेही वाचा - 'आरे कारशेड' प्रकरणी सेना बॅकफूटवर; उद्धव ठाकरे म्हणतात...

याबाबत स्थायी समितीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना आरेमधील झाडे तोडीबाबत न्यायालयात केस दाखल करण्यात आली होती. या केसबाबत स्थायी समिती आणि सभागृहाला कोणतीही माहिती दिली जात नाही. काल याबाबतची याचिका फेटाळताच रात्री झाडे तोडण्यात आली. पालिका विधी विभागावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करते मात्र, अशी माहिती लपवली जाते. रात्री झाडे तोडणे बेकायदेशीर आहे. यामुळे झाडे तोडणाऱ्या मेट्रोवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रवी राजा यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी रात्रीच्या वेळी बेकायदेशीर काम चालतात. असे बेकायदेशीर काम सरकारकडून केले जात आहे. रात्री झाडांना हात लावत नाही, यामुळे रात्री झाडे तोडणे चुकीचे असल्याचे राखी जाधव यांनी म्हटले आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मेट्रोकडून रात्री झाडे तोडली गेली आहेत. पालिका रात्रीची झाडे तोडायला परवानगी देते का? याबाबत काय नियम आहेत? याची माहिती स्थायी समितीने द्यावी, असे निर्देश दिले. रात्रीच्या अंधारात काम करण्याच्या प्रकारामुळे चुकीचा संदेश नागरिकांमध्ये जात आहे. यामुळे संशय निर्माण होत आहे. रात्री झाडे तोडण्याचा नियम नसल्यास झाडे तोडायचे काम त्वरित थांबवावे, असे निर्देश यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details