मुंबई - हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी व देशद्रोही वक्तव्य केल्याप्रकरणी शर्जील उस्मानीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. एल्गार परिषदेच्या आडून जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचे भातखळकर यांनी सांगितले. यासंदर्भात कारवाई करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.
शर्जील उस्मानीविरोधात कारवाई कधी?
30 जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने 'हिंदू समाज सडलेला आहे' असे वक्तव्य करून तमाम हिंदू धार्मियांच्या भावना दुखावण्याचे व असे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचे दुष्कृत्य केले आहे. शर्जील उस्मानी याचे हे वक्तव्य पूर्णपणे देशविघातक असून त्याच्या विरोधात सामाजिक भावना दुखावण्यासह देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी भाजपचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडोशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2017 साली आयोजित एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगाव येथे मोठी दंगल झाली होती व संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमठले होते. असे असतानासुद्धा या वर्षी पुन्हा एकदा एल्गार परिषदेला परवानगी देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. या वर्षीच्या एल्गार परिषदेतसुद्धा मागच्या वेळी प्रमाणानेच केवळ समाजात तेढ निर्माण होईल आणि देशविघातक शक्तींना पाठबळ मिळेल असेच प्रक्षोभक वक्तव्य करण्यात आले. शर्जील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच मी इथे एक मुस्लिम तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे, अशी गरळ ओकली. या भाषणात त्याने हिंदू विरोधी वक्तव्य करण्यासोबतच भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही, असेही विधान केले आहे. त्याचे हे विधान भारतीय संघराज्याचा अपमान करणारे व भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे. यापूर्वी शर्जील उस्मानी याला सीएए-एनआरसी विरोधातील आंदोलनाच्या वेळी देशद्रोही वक्तव्य केल्यामुळे अटक सुद्धा करण्यात आली होती व तो सध्या जामिनावर सुटलेला आरोपी आहे, इतकेच नव्हे तर सुप्रीम कोर्टाकडून राम मंदिर प्रकरणाच्या निकालानंतर त्या निर्णयाला विरोध करत आम्ही बाबरी मस्जिद पुन्हा उभारू असे वक्तव्य केले होते. इतके प्रक्षोभक व भडकाऊ भाषण करणाऱ्या देशद्रोही आरोपीला महाराष्ट्रात भाषण करण्याची परवानगी देण्यात आली. एल्गार परिषदेतील त्याच्या भडकाऊ व देशविघातक भाषणाचे फुटेज व सर्व पुरावे पोलीसांकडे असताना सुद्धा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता शर्जील उस्मानी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी आग्रही मागणीसुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे.
हेही वाचा -पाचवीतील 'लिवजोत' देणार दहावीची बोर्ड परीक्षा!
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अशा देशविघातक कृत्यांना पाठबळ देण्याचेच काम केले जात आहे. एल्गार परिषदेच्या आडून जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न होता अशी घणाघाती टीकासुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
हेही वाचा -कळंबा कारागृहात पोलीसच देतात आरोपींना निरोपाच्या चिठ्ठ्या; चौकशी सुरू