मुंबई - गंभीर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शनचा पुन्हा एकदा राज्यात मोठ्या प्रमाणावर तुडवडा निर्माण झाला आहे. खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही काल जनता दरबारात याची कबुली दिली आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) आता रेमडेसीविरची तुडवडा दूर झाला असून पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. 'कालपर्यंत रेमडेसीविरचा तुडवडा होता हे खरे आहे. पण हा तुडवडा एका कंपनीच्या इंजेक्शनची एक बॅच सदोष निघाल्याने झाला होता. हे इंजेक्शन बाद ठरले आहेत. तर, एका कंपनीचा साठा पोहचण्यास काही अडचणी येत होत्या. त्यामुळे मागील चार-पाच दिवस तुडवडा निर्माण झाला होता. पण आता मात्र राज्यभर पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा एफडीएने केला आहे.
कोरोनावर अजूनही रामबाण औषध आलेले नाही. असे असले तरी गंभीर रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन दिले जात असून हे इंजेक्शन उपयोगी ठरत आहे. मात्र या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या कमी असून ही इंजेक्शन महागडी आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच या इंजेक्शनचा तुडवडा आणि काळाबाजार दिसून येतो. इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करत काळाबाजाराला आळा घालण्यासाठी एफडीएने विविध उपाययोजना केल्याचे सांगितले आहे. पण तरीही राज्यभर आजही रेमडेसीविरचा तुडवडाही आहे आणि काळाबाजारही सुरूच असल्याची चर्चा आहे. त्यात काल, बुधवारी टोपे यांनीच इंजेक्शनचा तुडवडा असल्याची कबुली जनता दरबारात दिली. महत्त्वाचे म्हणजे या जनता दरबारात अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आले. त्यानंतर त्यांनी याचा आढावा घेत स्वतः 1000 रेमडेसीविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले.
हेही वाचा -सुशांत राजपूत प्रकरण : सिमॉन खंबाटा एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर