मुंबई - गेल्या आठवड्यात अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) ने वांद्रे पश्चिम येथील नामांकित अशा ताज लॅण्डस एंड या पंचतारांकित हॉटेलविरोधात कारवाई केली होती. या कारवाईतुन पंचतारांकित हॉटेलमधील स्वच्छतेचा आणि सुरक्षित अन्न पदार्थांचा पर्दाफाश झाला आणि एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे पंचतारांकित हॉटेलमधील अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता एफडीएने आपला मोर्चा मुंबईतील बड्या पंचतारांकित हॉटेलकडे वळवला आहे. कालपासून (सोमवार, 8 मार्च) मुंबईतल्या नामांकित पंचतारांकित हॉटेलची तपासणी मोहीम सुरू केली आहे. आता या तपासणीत कोणत्या हॉटेलची पोलखोल होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
झुरळांचा सुळसुळाट आणि मुदतबाह्य अन्न पदार्थ
पंचतारांकित हॉटेल म्हटले की ते अतिशय स्वच्छ, तेथे उपलब्ध असणारे अन्न पदार्थ सर्वोत्तम दर्जाचे आणि ताजे असा समज असतो. पण एफडीएने ताज लॅण्डस एंड हॉटेलवर केलेल्या कारवाईतुन पंचतारांकित हॉटेलमधील वस्तुस्थिती समोर आली आहे. तर ही पंचतारांकित हॉटेलच कसे ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याची कशी 'ऐशी की तैशी' करत आहेत हे समोर आले. या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुदतबाह्य ज्यूस, चीझ, बटर आणि अन्य अन्न पदार्थ आढळून आली. तर फ्रीजमध्ये योग्य तापमान ही राखले जात नव्हते. त्याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे या हॉटेलच्या स्टोरेज रूममध्ये झुरळांचा सुळसुळाट होता. याची गंभीर दखल घेत एफडीए या हॉटेलविरोधात आता कडक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार लवकरच त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत केकरे, सहआयुक्त, बृहन्मुंबई, (अन्न ), एफडीए यांनी दिली आहे.