मुंबई: स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणात (sexual assault of minor girl) अटक करण्यात आलेल्या वडिलांची आज कोर्टातून निर्दोष मुक्तता झाली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष POCSO कोर्टाने गेल्या सात वर्षापासून सुरू असलेल्या या खटल्यावर हा निकाल दिला. आरोपी विरोधात 2015 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी तुरुंगात होता. मुंबई उच्च न्यायालयातील विशेष POCSO न्यायाधीश कल्पना पाटील यांनी निकालात असे नमूद केले की पीडितेची आई आणि आरोपी वडिल यांच्यातील तणावपूर्ण संबंधातून अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांविरूद्ध बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार दाखल केली.
7 वर्षापूर्वीची आहे केस: अल्पवयीन पीडित मुलीने घडलेल्या घटनेबद्दल आपल्या मैत्रिणीला सांगितल्यानंतर एका सामाजिक संस्थेच्या मदतीने 6 ऑक्टोबर 2015 रोजी तिच्या वडिलांविरुद्ध एलटी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तीन दिवसांनी 9 ऑक्टोबर रोजी आरोपी वडिलांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तक्रारीनुसार अल्पवयीन मुलीने आरोप केला होता की तिचे वडील 2013 ते 2015 दरम्यान तिच्या खाजगी अंगाला जबरदस्तीने स्पर्श करत असत. पीडित मुलीने सांगितले होते की 22 जुलै 2014 रोजी आई कामासाठी बाहेर गेली असताना तिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा 11 सप्टेंबर 2015 रोजी सुद्धा अत्याचार केला होता.