मुंबई-केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारीपासून देशभरातील टोलनाक्यावर फास्ट टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली बंधनकारक केली आहे. जर फास्ट टॅग नसेल तर दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मात्र केंद्राच्या या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून नव्हे तर 26 जानेवारीपासून होणार आहे. त्यातही आधी केवळ वांद्रे-वरळी सी लिंक, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, सातारा-कागल मार्ग आणि मुंबई एन्ट्री पॉईंट (दहिसर टोल नाका वगळता) या चार महत्त्वाच्या टोलनाक्यावर 26 जानेवारीपासून फास्ट टॅगची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)चे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील सर्वच्या सर्व 42 टोलनाक्यावर मार्चपर्यंत फास्ट टॅग बंधनकारक होईल असेही त्यांनी सांगितले आहे.
वर्षभरापूर्वी फास्ट टॅगचा निर्णय
टोल नाक्यावरील गर्दी आणि वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी केंद्र सरकारने फास्ट टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली सुरू केली आहे. फास्ट टॅग हे एक स्टिकर असून ते गाडीच्या समोरील बाजूला लावले जाते. या स्टिकर असणाऱ्या वाहनधारकांना आरएफआयडीमार्फत टोलचे पैसे भरता येतात. तर वाहनचालकांचे बँक खाते या फास्ट टॅगशी जोडलेले असते. त्यामुळे काही सेकंदात टोल भरणे सहज शक्य होत आहे. नव्या सर्व चारचाकी वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. तर फास्ट टॅग असणाऱ्या गाड्यांसाठी दोन-दोन स्वतंत्र मार्गिका अनेक टोलनाक्यावर तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान ही प्रणाली लागू करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला होता. मात्र देशभरातील सगळ्या टोलनाक्यावर हे प्रणाली कार्यान्वित करणे आणि सर्व गाड्यांना फास्ट टॅग पुरवणे तात्काळ शक्य नव्हते. त्यामुळे देशभरात सर्वच्या सर्व टोलनाक्यांवर फास्ट टॅग बंधनकारक करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती.
आता मात्र 1 जानेवारीपासून फास्ट टॅग बंधनकारक, केंद्राची घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 1 जानेवारीपासून देशात फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता फास्ट टॅग नसेल तर वाहनांना दुप्पट टोल दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. दरम्यान या प्रणालीमुळे आता वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. केंद्राने दोन महिन्यांपासून या बाबतची जनजागृती सुरू केली आहे. तर तशी तयारी ही केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नॅशनल हायवे ऍथॉरीटीच्या रस्त्यावर याची 1 जानेवारी पासून सहज अंमलबजावणी सुरू करता येणार आहे. तशी अंमलबजावणी सुरू ही होईल. पण महाराष्ट्रात मात्र फास्ट टॅग जरा उशिरा लागू होणार आहे.