मुंबई -राज्याला दर दोन-तीन वर्षांनी पाचवीला पुजलेला दुष्काळ, गारपीट, अवकाळी, महापूर या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सावकारी व बँकांच्या कर्जाचा डोईजड झालेला बोजा सहन न झाल्याने महाराष्ट्राच्या स्थापनेपासून दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढतच राहिल्या. तत्कालीन युती सरकारची हमीभावाची घोषणा आत्महत्या रोखण्याचे आश्वासन फोल ठरल्याचे दिसत आहे. आता नव्या महाविकास आघाडी सरकारपुढे राज्यातील बळीराजाचा संसार वाचवण्याचे कडवे आव्हान असणार आहे.
हेही वाचा... ..म्हणून आंदोलक महिलांनी खासदार धैर्यशील मानेंसमोरच मारल्या पंचगंगेत उड्या
राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या काही थांबताना दिसत नाही. सरत्या वर्षात राज्यभरात दोन हजार 771 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे. त्यात अमरावती विभागात सर्वाधिक तर औरंगाबाद दुसऱ्या स्थानी आणि नाशिक तिसऱ्या स्थानावर आहे. सरकारी निकषांमुळे शासनाकडून तब्बल एक हजार 443 आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत मिळू शकलेली नाही.