महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नव्या कृषी कायद्या विरोधात राज्यातील वातावरणही तापले, शेतकऱ्यांचा एल्गार - महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन

Maharashtra Farmers against Center
नव्या कृषी कायद्या विरोधात राज्यातील वातावरणही तापले, आज शेतकऱ्यांचा एल्गार..

By

Published : Dec 3, 2020, 9:19 AM IST

Updated : Dec 4, 2020, 1:53 AM IST

01:48 December 04

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला स्वाभिमानीचा पाठिंबा, बीडमध्ये जागर आंदोलन

केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेले नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. अनेकवेळा मागणी करूनही केंद्र सरकार हे कायदे रद्द करत नसल्याने, गुरुवारी रात्री बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर आंदोलन करण्यात आले.

01:34 December 04

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीत 'आत्मक्लेश जागर' आंदोलन

दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आत्मक्लेश जागर आंदोलन करण्यात येत आहे. संपूर्ण रात्र जागून हे आंदोलन करण्यात येणार आहे.

22:41 December 03

पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जागर आंदोलन; शेतकरी आंदोलनाला दर्शविला पाठिंबा

पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जागर आंदोलन; शेतकरी आंदोलनाला दर्शविला पाठिंबा

पुणे - कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

22:32 December 03

नागपुरात कृषी कायद्याविरोधात 'आप' आक्रमक; शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा

नागपुरात कृषी कायद्याविरोधात 'आप' आक्रमक; शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा

नागपूर -नवा कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत. नागपुरातही आम आदमी पक्षाकडून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शिवाय केंद्र सरकारने कृषी कायदा वापस घ्यावा, अशी प्रमुख मागणीही यावेळी 'आप' कडून करण्यात आली. शहरातील संविधान चौकात एकत्र येत हे आंदोलन करण्यात आले. यात विविध फलकांचा वापर करत जोरदार घोषणाही करण्यात आली.

22:06 December 03

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे समर्थन; वर्ध्यातही विविध संघटनांचे धरणे

वर्धा येथील परिस्थिती

वर्धा - केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी वर्ध्यात विविध संघटनांनी एकत्र येऊन गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) गांधी पुतळ्याजवळ हे धरणे आंदोलन करण्यात आले.

22:03 December 03

जागरण गोंधळ घालत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालन्यात आत्मक्‍लेश आंदोलन

आढावा घेताना प्रतिनिधी

जालना - दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जालन्यात देखील आंदोलन सुरू करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागरण-गोंधळ, किर्तन आणि पोवाडा सादर करून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे.

21:34 December 03

कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपुरात काँग्रेसने जाळले पंतप्रधान मोदींचे फलक

कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपुरात काँग्रेसने जाळले पंतप्रधान मोदींचे फलक

नागपूर - नव्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. यात आता काँग्रेसनेही उडी घेतली असून गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) नागपुरात निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र असलेल्या पोस्टरचे दहन करण्यात आले. तसेच कृषी कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. शहरातील देवडीया काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

20:34 December 03

कोल्हापूर रात्रभर चालणार 'स्वाभिमानी'चे आत्मक्लेश जागर

आंदोलनात सहभागी राजू शेट्टी व शेतकरी बांधव

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागर आंदोलनाला सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश जागर आंदोलन सुरू आहे. भजन-अभंग म्हणत रात्रभर हे जागर आंदोलन चालणार असून याठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित आहेत. 

20:15 December 03

शेतकरी आंदोलन, चांदूर रेल्वेत अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

चांदूर रेल्वेत अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

अमरावती - दिल्ली येथील कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनावर दडपशाही करणाऱ्या शासकीय धोरणाचा अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) तहसीलदारांकडे देण्यात आले.

19:54 December 03

शेतकरी आंदोलनाला सांगलीत सर्वपक्षीय पाठींबा

शेतकरी आंदोलनाला सांगलीत सर्वपक्षीय पाठींबा

19:51 December 03

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा दर्शवत साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा दर्शवत साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने

सातारा - दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या या शेतकरी राजाला पाठिंबा आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस मुख्यालयासमोर गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) मोदी सरकारचा निषेध करत निदर्शने करण्यात आली.

19:46 December 03

सोलापुरात रस्ता रोको, पोलिसांची तारांबळ

सोलापुरात रस्ता रोको, पोलिसांची तारांबळ

सोलापूर- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे सोलापुरात पडसाद उमटले आहेत. गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) शहरात सकाळी गेंट्याल चौक येथे सिटू, डीवायएफआय, एसएफआय, जनवादी महिला संघटना यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मार्क्सवादी पक्षाशी संलग्न असलेल्या विविध संघटनांच्या वतीने माजी आमदार नरसय्या आडम आणि सिटुचे महासचिव एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली अचानकपणे रास्तारोको करण्यात आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती.

19:37 December 03

पुणे : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुरोगामी संघटनेच्यावतीने 'मानवी साखळी'चे आयोजन

पुरोगामी संघटनेच्यावतीने 'मानवी साखळी'चे आयोजन

पुणे -नव्याने लागू करण्यात आलेले कृषी कायदे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील मंडई परिसरात सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांच्यावतीने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या मानवी साखळीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

18:19 December 03

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भोकरदन काँग्रेसच्या वतीने आंदोलन

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनात भोकरदन काँग्रेसच्या वतीने आंदोलन

जालना - दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येथील शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. शेतकरी कायद्याविरोधात केंद्र सरकारविरोधात लाखो शेतकरी दिल्ली जिल्ह्याच्या सीमेवर ठिय्या देऊन गेल्या पाच दिवसांपासून बसले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट आधार भावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीनही शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी विधेयक पुढे रेटण्याचे कार्यक्रम बंद करा, अशा प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन सुरू आहे.

17:35 December 03

शेतकरी व कामगारांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा 8 डिसेंबरला चक्का जाम

मुंबई - शेतकरी विरोधी कृषी कायदा आणि कामगार कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील लाखो शेतकरी दिल्लीतील रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील 77संघटना एकवटल्या आहेत. मोदी सरकारने शेतकरी आणि कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 8 डिसेंबरला देशभरात 1 कोटी वाहन चालक चक्का जाम आंदोलन करतील, असा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे विश्वास उटगी यांनी दिला आहे.

17:32 December 03

काँग्रेसच्या आंदोलनाचा फज्जा; कंधारमध्ये एका दिवसाचे आंदोलन तासभरात गुंडाळले

काँग्रेसचे आंदोलन

नांदेड - केंद्र शासनाने लागू केलेल्या शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी दिल्ली येथे देशातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या लढ्यातील शेतकरी बांधवांना पाठिंबा म्हणून काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारले होते. मात्र, कंधारमध्ये हे आंदोलन एका तासातच गुंडाळण्यात आले.

17:26 December 03

केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या प्रतिमेला प्रहार संघटनेचे 'जोडे मारो' आंदोलन

केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या प्रतिमेला प्रहार संघटनेचे 'जोडे मारो' आंदोल

नाशिक -केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याविरोधात प्रहार संघटनेने नाशिकमध्ये त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे. 

काय म्हणाले होते कटारिया -

हरियाणामधील अंबाला येथे रेल्वे पूलाचे भूमिपूजन करण्याकरिता आलेले केंद्रीय राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यामुळे संतापलेल्या कटारिया यांनी जर शेतकऱ्यांना विरोधच करायचा आहे आणि काळे झेंडेच दाखवायचे आहेत, तर त्यांनी दुसरीकडे जावून मरावे, असे वादग्रस्त विधान केले.

17:10 December 03

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बीडमधून पाठिंबा; भाकपकडून मोदी सरकारविरोधात निदर्शने

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बीडमधून पाठिंबा

बीड- शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधार भावाचे रास्त संरक्षण द्या, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, यासह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे वेगवेगळ्या राज्यातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्रित आले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकरी रस्त्यावर उतरून पंतप्रधान मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

17:02 December 03

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; लातुरात सर्वपक्षीय नेते एकत्र

लातुरात सर्वपक्षीय नेते एकत्र

लातूर - कृषी कायद्यासह कामगार कायदा हा अन्यायकारक आहे. त्यामुळे देशभर आंदोलने केली जात आहेत. तर राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज लातूर येथील गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.यावेळी काँग्रेसच्यावातीनेही पाठिंबा देण्यात आला आहे.

17:00 December 03

कृषी कायद्याविरोधात विविध पक्ष अन् संघटनांचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पालघर - दिल्ली येथे नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासासाठी देशासह राज्यात देखील अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. पालघरमध्येही केंद्र सरकारने लागू केलेल्याा नव्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, माकप, कष्टकरी संघटना आदींसह जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

16:28 December 03

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; यवतमाळमध्ये धरणे आंदोलन

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; यवतमाळमध्ये धरणे आंदोलन

यवतमाळ - केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आता शेतकरी मरतील पण कायदा रद्द केल्याशिवाय परत येणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. या आंदोलनाला काँग्रेसने समर्थन दिले आहे. तसेच विदर्भातील पाच हजार शेतकरी या दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार आहेत. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन म्हणून आता यवतमाळ येथील आझाद मैदानामध्ये काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन देण्यात आले.

16:23 December 03

शेतकरी आंदोलनाला सांगलीत सर्वपक्षीय पाठींबा

सांगलीतील आंदोलक

सांगली- दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्राच्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी सांगलीमध्ये गुरूवारी (दि. 3 डिसेंबर) विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करत केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.

16:20 December 03

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशकात शेतकरी संघटना आक्रमक

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशकात शेतकरी संघटना आक्रमक

नाशिक -दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तहसील कार्यालयावर निषेध करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान संघर्ष व समन्वय समिती, यासह वेगवेगळ्या शेतकरी आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येईल केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले.

16:16 December 03

शेतकरी आंदोलन चिघळल्यास रायगड जिल्ह्यातील रस्ते बंद करू; उल्का महाजन यांचा आंदोलनात इशारा

शेतकरी आंदोलन चिघळल्यास रायगड जिल्ह्यातील रस्ते बंद करू

रायगड - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत जन आंदोलनाची संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दिल्लीत आंदोलन चिघळले तर याचे पडसाद जिल्ह्यातही उमटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या भावनांचा विचार भाजप सरकारने करावा. अन्यथा जिल्ह्यातील रस्ते बंद करू, असा इशारा संघर्ष समितीच्या नेत्या उल्का महाजन यांनी दिला आहे.

15:46 December 03

दिल्ली शेतकरी आंदोलनाचे सोलापुरात पडसाद, सिटूकडून शहरात रस्ता रोको

सोलापुरातील आंदोलन

सोलापूर- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे सोलापुरात पडसाद उमटले आहेत. गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) शहरात सकाळी गेंट्याल चौक येथे सिटू, डीवायएफआय, एसएफआय, जनवादी महिला संघटना यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मार्क्सवादी पक्षाशी संलग्न असलेल्या विविध संघटनांच्या वतीने माजी आमदार नरसय्या आडम आणि सिटुचे महासचिव एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली अचानकपणे रास्तारोको करण्यात आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती.

15:25 December 03

शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करण्यासाठी बुलडाण्यात झाडावर चढून 'स्वाभिमानी'चे आत्मक्लेश आंदोलन

बुलडाण्यात झाडावर चढून 'स्वाभिमानी'चे आत्मक्लेश आंदोलन

बुलडाणा - शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करण्यासाठी व दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तृत्वात आज (गुरुवार) संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढून अर्धनग्ण होऊन आत्मक्लेश आंदोलन केले आहे.


 

15:20 December 03

दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेडच्या गुरुद्वारात अखंड पाठ

नांदेडच्या गुरुद्वारात अखंड पाठ

नांदेड - केंद्र शासनाने पावसाळी अधिवेशनात घाईमध्ये काही शेतकरी विधेयकं मंजूर करून त्यांचे कायद्यात रुपांतर केले. या कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरियाणा सह विविध राज्यातील शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. लाखो संतप्त शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिंधू सीमेवर धडक दिली आहे. या आंदोलनकर्त्यांना सीमेवरच अडवण्यात आले असून त्यांना रोखण्यासाठी शासनाने अमाणूषणा केला आहे. तरीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेड येथील सचखंड गुरुद्वारामध्ये गुरुनानक जयंतीपासून अखंड पाठ सुरू आहे.


 

13:25 December 03

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू..

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी शेतकरी दिल्लीत मरायला आलेत अशा आशयाचे विधान केले होते. त्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली असून, कटारिया यांच्या प्रतिमेला जोडे मारत प्रहारने आंदोलन सुरू केले आहे.

13:23 December 03

..तर काँग्रेसला अडचण का? - राम कदम

..तर काँग्रेसला अडचण का? - राम कदम

केंद्राच्या कृषी कायद्यांचा शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. शेतकरी आणि ग्राहकांच्या मधील दुवा नाहीसा करुन शेतकऱ्यांना थेट फायदा मिळवून देण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे, असे असताना काँग्रेसला काय अडचण आहे, असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

08:40 December 03

नव्या कृषी कायद्या विरोधात राज्यातील वातावरणही तापले, आज शेतकऱ्यांचा एल्गार..

मुंबई :नव्या कृषी कायद्याविरोधातील देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमिवर आज (गुरुवार) राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे राज्यात केंद्र सरकार विरोधात आज शेतकरी एल्गार पुकारणार आहेत.

सर्व समविचारी संघटनांचा समावेश..

राज्यातील सर्व समविचारी शेतकरी संघटना, तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी आणि तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. शिवाय ठिकठिकाणी रास्ता रोको ही केला जाणारआहे. शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले हे आपापल्या भागातून आंदोलनाचे नेतृत्व करतील.

काँग्रेसचेही आज राज्यभरात आंदोलन..

नव्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे अशा सूचना प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काँग्रेसकडूनही राज्यात आज आंदोलन केले जाणार आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या बाबत सुचना केल्या आहेत. जोपर्यंत जुलमी कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

आत्मक्लेश जागर आंदोलन..

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसोबत रात्रभर 'आत्मक्लेश जागर' आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन 3 डिसेंबरला रात्री 8 वाजल्यापासून 4 डिसेंबरला सकाळपर्यंत सुरू राहणार आहे. या आंदोलनात राजू शेट्टीही सहभागी होणार आहेत.

Last Updated : Dec 4, 2020, 1:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details