मुंबई-नविन शेतकरी कायद्यावरून देशात आंदोलने सुरू आहेत.शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा कायदा रद्द करा, यासाठी शेतकरी बांधव 27 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर बसले आहेत. या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील दिसू लागले आहेत. दरम्यान आज (मंगळवार) मुंबईत शेतकऱ्यांनी अदानी-अंबानीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.
ज्येष्ठ शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी आजच्या बीकेसी मोर्चात सहभाग घेतला. "मोदी-शहां हे कायदा मागे घ्यायला तयार नाहीत. तेव्हा आता आपण त्यांना हा कायदा मागे घ्यायला भाग पाडू. जसा राक्षसाचा जीव पोपटात असतो. तसा मोदी-शहांचा जीव अदाणी-अंबानी मध्ये आहे. त्यामुळे आता या पोपटाच्या मुंड्या आम्ही मुरगळु. त्यांच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकु आणि एक दिवस ते स्वतः मोदी-शहांकडे कायदा मागे घेण्याची मागणी करतील, अशी परिस्थिती निर्माण करू", असा निर्धार राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी आजच्या बीकेसी मोर्चात घेतला आहे. यावेळी जिओ कार्डची होळी करत आणि अदानी-अंबानी यांच्या उत्पादनावर बंदी घालण्याची शपथ घेत, मोर्चाची सांगता करण्यात आली.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मुंबईत-
केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा मागे घ्यावा, यासाठी दिल्लीच्या वेशीवर पंजाब-हरियाणामधील लाखो शेतकरी 27 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी बीकेसीतील अंबानीच्या कार्यालयावर धडकण्याची हाक दिली. त्यानुसार आज दुपारी कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, अमरावती, अशा सर्व जिल्ह्यातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर जमले. येथून ते बीकेसीला जाणार होते. पण त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आरएनए पार्क येथेच पोलिसांनी अडवले. दरम्यान या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कायदा मागे घ्यावाच लागेल-
या आंदोलनात राजू शेट्टी यांच्यासह ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, शेतकरी नेते जयंत पाटील, कपिल पाटील, प्रकाश रेड्डी आदी नेते सहभागी झाले होते. तर राज्यमंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांना मुंबईत येण्यापासून पोलिसांनी रोखले. त्यामुळे ते मोर्चात सहभागी होऊ शकले नाहीत. पण त्यांच्या प्रहार संघटनेचे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात सर्वच मान्यवरांनी कृषी कायदा मागे घेण्याची मागणी केली. तर शेतकरी आपले आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र करतील आणि एक दिवस त्यांना हा कायदा मागे घ्यावाच लागेल, आम्ही त्यांना यासाठी भाग पाडू असा निर्धार यावेळी शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी केला.
जिओ कार्डची होळी-