मुंबई - कोकणातील प्रसिद्ध असलेला हापूस आंब्याच्या सिझन मे महिन्यात सुरू होतो. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हा चवदार आंबा खाण्याचा मोह आवरता येत नाही. पण आता हापूस आंब्यासारखाच हुभेहुब दिसणारा कर्नाटकी आंबाही बाजारात आल्याने हापूस आंबा कसा ओळखायचा, हा प्रश्न आंबाप्रेमीसमोर उपस्थित झाला आहे. यामुळे हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास फसवणूक होत आहे.
कर्नाटकी आंब्याचा दर हापूस आंब्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. याचाच फायदा घेत जास्त नफा कमवण्यासाठी काही विक्रेते हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत आहेत. हापूस आंबा कसा ओळखावा हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतने तयार केलेला विशेष रिपोर्ट.
आंबे विक्रेते नागेश मयेकर यांच्यासबोत ईटिव्हीचे प्रतिनिधी आज मोठ्या प्रमाणावर मुंबई शहरात जागोजागी हापूस आंबे विक्रेत्यांची रेलचेल दिसत आहे. परंतु, हापूस आंब्याच्या स्पर्धेत कर्नाटकी आंबा उतरल्यामुळे हापूस आंब्याच्या विक्रीत घट होताना दिसत आहे. हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत असल्यामुळे आमचे उत्पन्न घटले आहे. यामुळे कोकणातील बागायतदारांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होणार आहे.
कोकण हापूसच्या एका डझनाची घाऊक बाजारातील किंमत ५०० ते ८०० रुपये; तर किरकोळ बाजारात ९०० ते १२०० रुपये आहे. कर्नाटकी आंबा प्रतिडझन किंमत २०० ते २५० रुपये; तर किरकोळ बाजारातील किंमत ३०० ते ३५० रुपये आहे. मात्र, अनेक किरकोळ विक्रेत्यांकडून कर्नाटकी आंबा हापूसच्या किमतीमध्ये विकण्याचा प्रकार घडत आहेत. हापूस आंबा कापल्यावर केशरी पिवळसर दिसतो आणि चवीला गोड असतो. देठाकडे सुगंध येतो. आंबा तयार झाल्यावर सुरकुत्या पडतात. साल पातळ असते. कर्नाटकी आंबा कापल्यावर पिवळा दिसतो. चवीला आंबट-गोड असतो. देठाकडे सुगंध येत नाही. साल जाड असते. यामुळे ग्राहकांनी आंबा विकत घेताना तो योग्य बागायतदाराकडून अथवा विक्रेत्याकडूनच विकत घ्यावा, असे आंबा विक्रेते नागेश मयेकर यांनी सांगितले.