मुंबई- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे यांचा अनेक उद्योगांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी आज विविध उद्योजकांशी कोरोना लॉकडाऊन काळातील अडचणी, नंतरच्या काळातील उपाययोजना यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.
प्रत्येक क्षेत्रातील सद्यस्थितीबाबत त्यांनी सविस्तर मते जाणून घेतली. या संवादसेतूमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे डॉ. पवन गोयंका (ऑटोमोबाईल्स), फिनिक्स मार्केटसिटी अतुल रूईया (रिटेल आणि मॉल्स), रेमंड्स समूहाचे गौतम सिंघानिया (वस्त्रोद्योग), रहेजा समूहाचे रवी रहेजा (हॉस्पिटॅलिटी, आयटी, रिटेल), सिद्धार्थ रॉय कपूर (चित्रपट निर्मिती), रियाझ अमलानी (हॉस्पिटॅलिटी अँड रेस्टॉरंट), नमन समूहाचे जयेश शाह (हॉटेल्स आणि पायाभूत सुविधा), वेल्सस्पन बी. के. गोयंका (वस्त्रोद्योग आणि पायाभूत सुविधा), एल अँड टीचे अनुप सहाय (पायाभूत सुविधा, वीज, संरक्षण), फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी (फूड सर्व्हिसेस), बीव्हीजेचे हनुमंतराव गायकवाड (अन्नप्रक्रिया, सेवा) आदी सहभागी झाले होते.