सरकार स्थापनेचा देवेंद्र फडणवीसांचा दावा, भाजपकडे कोणते पर्याय उपलब्ध ? - बीजेपी
राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाचे 106 आमदार निवडून आले आहे. तर अपक्ष आमदारांचा पाठींबा भाजपला आहे. मात्र तरीही भारतीय जनता पक्ष बहुमताचा 145 आकडा पार करू शकत नाही. त्यामुळे या आकड्याची जमवाजमव भारतीय जनता पक्ष कसं करणार? हा सवाल उपस्थित होतो.
![सरकार स्थापनेचा देवेंद्र फडणवीसांचा दावा, भाजपकडे कोणते पर्याय उपलब्ध ? देवेंद्र फडणवीस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12484231-710-12484231-1626497499839.jpg)
देवेंद्र फडणवीस
मुंबई - हे सरकार आपल्याच कर्माने कोसळेल, आणि हे सरकार जेव्हा कोसळेल त्या वेळेस आम्ही पर्यायी सरकार देऊ असा दावा विधानपक्ष विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून अजूनही सुरू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आम्ही सरकार पाडणार नाही, पण पडल्यास पर्यायी सरकार देऊ असेही फडणवीस म्हणाले. सरकार स्थापनेसाठी भाजप कडून अजून पर्याय उपलब्ध आहेत का? यावर देखील आता तर्क वितर्क लावले जात आहेत.
सरकार स्थापनेचा देवेंद्र फडणवीसांचा दावा,
राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाचे 106 आमदार निवडून आले आहे. तर अपक्ष आमदारांचा पाठींबा भाजपला आहे. मात्र तरीही भारतीय जनता पक्ष बहुमताचा 145 आकडा पार करू शकत नाही. त्यामुळे या आकड्याची जमवाजमव भारतीय जनता पक्ष कसं करणार? हा सवाल उपस्थित होतो. त्यातच पावसाळी अधिवेशनात गैरवर्तणुकीमुळे भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे एक वर्षाच्या कालावधीत सरकार स्थापन करावयाचे झाल्यास या 12 आमदारांना त्यात भाग घेता येणार नाही.
महाविकासआघाडी मध्ये असलेली धुसफूस
महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये काही ना काही वाद सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात सध्या सुरू असलेल्या शाब्दिक चढाओढीमुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या काही आलबेल नसल्याचेच चित्र आहे. मात्र, तिन्ही पक्षातील नेत्यांकडून आघाडीत कोणतीही नाराजी नसल्याचे वक्तव्य सातत्याने केले जात आहेत. तसेच आघाडी सरकार हे आपलं कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वासही तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. मात्र महाविकास आघाडी सरकार बद्दल जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत, असा आरोप आघाडी सरकारच्या नेत्यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार पाडून भारतीय जनता पक्षाचे सरकार आणण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले आहेत. त्यामुळे वैफल्यातून सातत्याने सरकार विरोधात वक्तव्य करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येते.
महाविकास आघाडी सरकारचे संख्याबळ
शिवसेना- 56
राष्ट्रवादी काँग्रेस -53
काँग्रेस - 43
अपक्ष -13
बहुजन विकास आघाडी-3
प्रहार जनशक्ती पार्टी - 2
समाजवादी पक्ष - 2
माकप- 1
शेकाप -1
स्वाभिमानी पक्ष - 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी-1
-----------------------------
एकूण - 186
बीजेपीकडून शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची चाचपणी?
राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापनेचे भारतीय जनता पक्षाकडून अनेक वेळा करण्यात आले असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन अडीच दिवसाच्या सरकार भारतीय जनता पक्षाने स्थापन केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीने आपलं सरकार स्थापन केले. भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या आमदारांची संख्या पाहता आघाडीतल्या काही आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाला आपलं सरकार स्थापन करता येणार नाही. कारण एवढ्या मोठ्या संख्येने कोणत्याही पक्षाचे आमदार भारतीय जनता पक्ष सोबत येणार नाही. तसेच काही आमदार भारतीय जनता पक्षाचे सोबत गेल्यात पक्षांतर विरोधी कायद्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेच्या मदतीशिवाय भारतीय जनता पक्षाला आपलं सरकार स्थापन करता येणार नसल्याचे मतं राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केलंय.शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे पंचवीस वर्षे युतीत एकत्र होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. विचारांच्या आधारावर हे दोन्ही पक्ष कधीही एकत्र येऊ शकतील अशी वक्तव्य सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून केली जातं आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना भारतीय जनता पक्ष सोबत युती करेल अशी शक्यता नाही. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करून शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका भारतीय जनता पक्ष आपली सर्व ताकद पणाला लावून महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथण्याचा प्रयत्न करणार आहे. जर असं झाल्यास शिवसेनेला तो मोठा राजकीय धक्का असेल. मात्र, तरीही शिवसेना सध्याच्या घडीला भाजप सोबत हातमिळवणी करण्याची शक्यता धूसर आहे. तसेच शरद पवार यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून राष्ट्रपती पदांसाठी गळ घालून राज्यात सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न होऊ शकेल. मात्र, शरद पवार यासाठी तयार होणार नाही असे मतंही विश्लेषक अजय वैद्य यांच्याकडून मांडण्यात आलंय.
भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ
भाजप - 106
जनसुराज्य शक्ती - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
अपक्ष - 5
----------------------
एकूण - 113
फडणवीस यांच्या दाव्यात तथ्य?
महाविकास आघाडी सरकार कोसळले तर, पर्यायी सत्ता देण्याचा दावा देवेंद्र फडणवीस सरकारने जरी केला असला तरी, तो दावा सध्यातरी निष्फळ दिसतोय. 2019 च्या विधानसभा निवडणुकी आधी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल आशा या सर्व नेत्यांना होती. मात्र निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार राज्य स्थापन झाले. त्यामुळे भारतीय जनता पक्षात गेलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांचा हिरमोड झाला एवढं मात्र नक्की. या नेत्यांना आपल्या पक्षात थांबवण्यासाठी राज्यामध्ये आपलं सरकार पुन्हा एकदा स्थापन होईल असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने केली जात असल्याची टीका महाविकास आघाडी सरकारचे नेते करत आहेत.
Last Updated : Jul 17, 2021, 10:29 AM IST