मुंबई -मुंबईसह आगामी राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आता जोरदारपणे उतरणार आहे. महानगरपालिकेमधील रस्ते, पाणी, नालेसफाई, स्वच्छता या सर्व प्रश्नांवर आम्ही रान उठवणार आहे. महागाईच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत. त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस अतिशय जोरदारपणे संघर्ष करेल, असा दावाही माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे. त्या 'ईटिव्ही भारत'शी बोलत ( Varsha Gaikwad On Mumbai Corporation Election ) होत्या.
'राजकारण हे साधन आहे, साध्य नाही' -वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जनसेवा हा उद्देश घेऊन आम्ही राजकारणात आलो. राजकारण हे साधन आहे, साध्य नाही याची आम्हाला पक्षाकडून आणि कुटुंबाकडून शिकवण मिळाली. मात्र, अलीकडच्या राजकारणात या सर्व गोष्टींना तिलांजली दिली जात आहे. निष्ठा बाजूला सारल्या जात आहे. पण, 'ये पब्लिक है सब जानती है'. राज्यात सध्या राजकारणात अस्थिरतेच वातावरण आहे. ज्या लोकप्रतिनिधींकडे आदर्श पणे पहावे, असे लोकप्रतिनिधी आता सापडत नाही. त्यामुळे तरुणांनी कुणाकडे पाहून राजकारणात यावं, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची खंतही गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
'राजकारणात नीतिमत्ता नाही' -महाराष्ट्रातील राजकारण आतापर्यंत थोडा बहुत फरकाने नितीमत्तेवर चालत आले आहे. पण, अलीकडे राजकारणात नीतिमत्ता शिल्लक राहिलेली नाही. आम्ही जनसेवा हाच राजकारणाचा उद्देश ठेवून राजकारणात आलो होतो. मात्र, अलीकडे केवळ सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी राजकारणात येत असल्याचे दिसते. वास्तविक राजकारणामध्ये कोणतीही साधन सुचिता शिल्लक राहिलेली नाही. नितीमत्ता लयास गेलेली आहे. एक वेगळी परंपरा सुरू झाल्याचे दुर्दैवाने दिसते. पक्षनिष्ठा आणि विचारधारा यांना पूर्णपणे तीलांजली मिळत असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.