मुंबई - राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे आता आवकाळी पावसाने दणका दिला आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी आणि गारपीट झाल्याने हातातोंडाशी आलेले पिक वाया गेले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे.
अमरावती
मागील चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. सलग चौथ्या दिवशी मेळघाटातील लवादा परिसरात तुफान गारपीट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिके पूर्णतः हातातून गेली आहे. अवकाळी पावसाचा फटका हा मेळघाट मधील मका गहू आदी पिकाना बसला आहे.
वाशिम
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार, लाठी, गोगरी, ईचा, हिरंगी, नागीसह परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पपई, टोमॅटो, गहू,टरबूज, कांदाबीज या पिकांचं मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरीव मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
धुळे
धुळे शहरासह साक्री तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली. साक्री गावसह आजूबाजूच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. प्रामुख्याने पिंपळनेर परिसराला अवकाळी पाऊसाने झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे गहू पिकाला व फळबागांना जोरदार फटका बसला आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात या अवकाळी पावसाचा अजून मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाचा इशारा या पूर्वीच दिला होता .
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात रविवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक गावातल्या आठवडी बाजारांवर मोठा परिणाम झालाय. दरम्यान, या पावसाचा शेतातील रब्बी पिकांना मोठा फटका बसणार आहे. दक्षिण भागातील गडहिंग्लज, नेसरी भागात तर पाऊसाने अक्षरशः झोडपून काढले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुणे
शनिवारी बारामती तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्याच बरोबर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके संकटात सापडली आहेत. बारामती तालुक्यातील काही भागात पावसाने तडाखा दिला तर काही भागात गारपीट झाली. या पावसाचा तालुक्यातील मोरगाव, उंडवडी, सोनवडी सुपे, जराडवाडी, कारखेल, तरडोली, आंबी खुर्द, जोगवडी, माळवाडी, आंबी बुद्रुक या परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. या भागातील शेतकऱ्यांचे काढणीला आलेले पीक या अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडले आहेत. गहू, हरभरा, मका,ज्वारी आदी काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अहमदनगर
शनिवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील पठारभागातील डोळासणे, हिवरगांव पठार गावा अंतर्गत असलेल्या सतेचीवाडी, खांबे, शिंदोंडी गावा अंतर्गत असलेल्या भागवत व माने वस्ती या भागात अवकाळी पावसासह गारपीटही मोठ्याप्रमाणात झाली. तर सगळ्यात जास्त खांबे परिसरातील शेतकर्यांच्या कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या शेतात गारांचा खचच दिसत होता. त्याच बरोबर गहू, डाळींब आदी पिकांना गारपीटीचा तडाखा बसला आहे. आधीच कोरोनाचे संकट, शेतीमाला बाजारभाव नाही त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे असे असतानाच आता पुन्हा गारपीटीने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे.
नाशिक
नाशिक जिल्ह्याच्या बागलाण, कळवण, सिन्नर या तालुक्यात बे-मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी पावसात कांद्या, द्राक्षे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून बाजूला रस्त्यावर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या गारपीट, अतिवेगवान सोसाट्याचे वारे व विजांच्या कडकडाटामुळे बागलाण व कळवण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. उपटून खांडणीच्या तयारीत शेतात पडलेला हजारो क्विंटल उन्हाळी कांदा भिजला. तर हजारो हेक्टरवरील द्राक्ष व डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. गहू, हरभरा, पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. गारपीटीची सर्वाधिक झळ कांद्यासह भाजीपाला पिकांना बसली. या गारपीटीमुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.
हेही वाचा -रविवारी राज्यात तब्बल 30 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद, 99 जणांचा मृत्यू