मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिका अधिक्षेत्रात मराठी नामफलकासाठी मद्य विक्रीची दुकाने व मद्य पुरविण्यात येणाऱ्या आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता दिनांक 30 जूनपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. विविध व्यापारी संघटनांनी महानगरपालिका प्रशासनाला केलेल्या विनंतीचा विचार करुन ही मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मराठी नामफलक आवश्यक -महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 24 , दिनांक 17 मार्च, 2022’ अन्वये ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, 2022’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमाचे कलम 36 क (1) च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम 7 लागू आहे. त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे. अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मात्र, मराठी भाषेतील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार ( Font Size ), इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी अक्षराचा आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे.