महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बोरीवलीपर्यंत हार्बर लोकलच्या विस्तार कामाला मिळणार गती - हार्बर रेल्वे मार्ग

बहुप्रतीक्षित गोरेगावपर्यंत असणाऱ्या हार्बर रेल्वे मार्गाच्या बोरीवलीपर्यंत विस्तार कामाला गती मिळणार आहे.

लोकल
लोकल

By

Published : Feb 7, 2021, 5:06 PM IST

मुंबई - बहुप्रतीक्षित गोरेगावपर्यंत असणाऱ्या हार्बर रेल्वे मार्गाच्या बोरीवलीपर्यंत विस्तार कामाला गती मिळणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प (एमयूटीपी 3-अ) मध्ये प्रथमच तब्बल 100 कोटीची भरीव तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील बोरिवलीपर्यंत विस्ताराच्या कामाला गती मिळणार आहे.

825.58 कोटी रुपयांचा खर्च-

7 किलोमीटर लांबीच्या गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याची योजना मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प (एमयूटीपी 3- अ) अंतर्गत आखण्यात आली. त्यासाठी 825.58 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यापैकी एमयूटीपी 3 (अ) तब्बल 100 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यामार्गावरील विस्तार झाल्यास सीएसएमटीतून बोरीवलीपर्यंतही प्रवास करणे शक्य होणार आहे.

पश्चिम रेल्वे करणार प्रकल्प पूर्ण-

सध्या सीएसएमटीवरून हार्बरच्या प्रवाशांना गोरेगावपर्यंतच प्रवास करता येतो. हार्बरचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यासाठी एप्रिल 2018 उजाडावे लागले. अंधेरी ते गोरेगाव हार्बरच्या मूळ योजनेची घोषणा 2009 मध्ये करण्यात आली होती. परंतु कामे पूर्ण करायला डिसेंबर 2017 पर्यंतची वाट पाहावी लागली. प्रत्यक्षात एप्रिल 2018 मध्ये गोरेगावपर्यंत हार्बर लोकल धावायला लागली. आता हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याची योजना मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प-3 (अ) अंतर्गत आखण्यात आली आहे. हा प्रकल्प पश्चिम रेल्वे पूर्ण करणार आहे.

प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट-

पश्चिम रेल्वेच्या लोकलची गर्दी विभागली जाणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि बोरिवलीचा विभाग अत्यंत गर्दीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. येथे लोकल गाड्यांना सर्वाधिक गर्दी असते. जर हार्बरचा विस्तार अंधेरी ते बोरिवलीपर्यंत झाला तर प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन पश्चिम रेल्वेच्या गाड्यांची गर्दी त्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. आता या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होताच चार ते पाच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

विरारपर्यंतही हार्बर-

पश्चिम रेल्वेवरील बोरीवलीपर्यंत पाच मार्ग असून सहावा मार्गही होणार आहे. तर आणखी हार्बरच्या दोन मार्गिकांचीही भर पडेल. त्यामुळे आठ मार्गिका बोरीवलीपर्यंत होतील. बोरीवलीपर्यंत हार्बरचा मार्ग तयार झाल्यानंतर हा मार्ग विरारपर्यंतही हार्बरहुन नेण्याचा रेल्वेचा विचार आहे.

हेही वाचा- केंद्र सरकार एखाद्या दारूड्या सारखं वागतंय -अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर

ABOUT THE AUTHOR

...view details