मुंबई- अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या सध्या 44 वर पोहोचली आहे. महाडमधील दुर्घटनेत 32 लोकांचा यात समावेश आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीची दर दोन तासाच्या कालावधीनंतर मुख्यमंत्री माहिती मागवत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. शुक्रवारी मंत्रालयातील आढावा बैठक संपल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आतापर्यंत ४४ लोकांचा मृत्यू
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. महाडमधील तळीये गावात दरड कोसळून अनेक कुटुंब गाडली गेली आहेत. प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत ४४ लोकांचा मृत्यू झाल्याचे मंत्री वडेट्टीवार म्हणाले. तसेच नांदेडमध्ये परिस्थिती गंभीर आहे. चंद्रपूरच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि गोसीखुर्द परिसर अतिवृष्टीचा इशारा आहे. पहिली प्राथमिकता ही लोकांचा जीव वाचवण्यासाठी असणार आहे. नुकसानीची पाहणी अद्याप नाही. सध्या तरी नुकसानीचा अंदाज घेता येणार नसल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.