मुंबई : माहीम येथील एका इमारतीत सुरु असणाऱ्या अवैध मद्य कारखान्यावर ( Illegal Liqour Factory ) राज्य उत्पादन शुल्क विभागाने ( Maharashtra Excise Department ) छापा टाकला. या कारवाईत देशी-विदेशी दारुचा सुमारे आठ लाख रुपये किंमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
माहिम परिसरातील कासा कोरोलीना इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अवैद्य मद्याचा धंदा सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काला ( Excise Department Raid Illegal liqour ) मिळाली होती. त्यानूसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून येथे छापा टाकला. यावेळी परदेशातून आयात केलेले विविध उच्च प्रतीचे विदेशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व परराज्यातील मद्य अशा एकूण विविध क्षमतेच्या १२३ सिलबंद बाटल्या व १८ रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. त्याची एकूण किंमत ८ लाख ३७ हजार ६९२ रुपये आहे. या गुन्हात झहीर होसी मिस्त्रीला महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अटक करण्यात आली. त्याला न्यायलयात हजर केले जाणार असल्याचे संबंधित विभागाचे मुंबई आयुक्त क्रांतीलाल उमाप यांनी सांगितले.