मुंबई -कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा जीव गेला आहे , राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहे. अशा परिस्थितीमध्ये न घाबरता आपलं कर्तव्य बजावण्यासाठी जे योद्धे मैदानात उतरले आहेत, त्यातलाच एक वर्ग म्हणजे कोविड सेंटरमध्ये काम करणारे सफाई कामगार आणि महापालिकेचे चतुर्थश्रेणी वर्गातील सफाई कामगार पण त्यांची कधीच चर्चा होत नाही. ना त्यांचं कधी कौतुक होतं पण तरीही कोणतीही अपेक्षा न ठेवता हे कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून आपल कर्तव्य पार पाडत आहेत. या कोरोना योद्ध्यांना जो सन्मान आणि जो हक्क मिळाला पाहिजे त्यांच्यापासून ते अद्याप वंचित आहेत.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. शहरातील रस्त्यांची नियमित सफाई करणे, कचराकुंडीमधील कचरा उचलणे, इतरत्र असलेला कचरा गोळा करणे आणि कोरोना रुग्णांच्या घरी जाऊन त्यांचा कचरा जमा करणे अशी जोखमीची कामे हे कर्मचारी करत आहेत. एवढेच नव्हे तर शहरामध्ये विविध ठिकाणी पीपीई किट, हँडग्लोव्हज, मास्क फेकलेले असतात ते देखील ह्या सफाई कामगारांना कोणत्याही सुरक्षाविषयक साधनांशिवाय उचलावे लागतात.
कामगारांची सुरक्षा रामभरोसे
पीपीई किट हे बायोमेडिकल वेस्ट प्रकारात येत असल्याने, त्याची विल्हेवाट ही विशेष खबरदारी घेऊन विशिष्ट पद्धतीने लावावी लागते. तसेच अन्य बायोमेडिकल वेस्ट हे प्रक्रिया केंद्रात जमा करणे आवश्यक आहे. हे काम संबंधित रुग्णालयांचे आहे. मात्र अनेकवेळा निष्काळजीपणे बायोमेडिकल वेस्ट हे कोणतीही प्रक्रिया न करता, इतर कचऱ्यासोबत डम्पिंग ग्राऊंडला टाकण्यात येते, हे बायमेडिकेल कसे गोळा करायचे, त्याची विल्हेवाट कशी लावायची याचे कोणतेही प्रशिक्षण सफाई कर्मचाऱ्यांना नसल्याने, सफाई कर्मचारी आजारी पडण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. सफाई कर्मचारी जीवाची पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडतात परंतु प्रशासन त्यांच्या जीवाशी खेळत असून, त्यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षाविषयक साधने पुरवली जात नाहीत. सॅनिटायझर दिले जात नाहीत, मास्क पुरवले जात नसल्याचा आरोप या सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे.