मुंबई -चिमण्यांचा सकाळचा चिवचिवाट कानावर पडला तरी मन प्रसन्न होते, मात्र या चिमण्या सिमेंटच्या जंगलात हरवत चालल्या आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. चिमणी हा निसर्गातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. त्यासाठी नवीन इमारती उभारताना त्यात काही बदल करणे आवश्यक असल्याचे मत पक्षीमित्र सुनिश कुंजू यांनी व्यक्त केले आहे.
नवीन इमारतीत चेंबरचे प्रमाण जास्त
मागच्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली आहे. पूर्वी मुंबईत चाळीचे प्रमाण मोठे होते. आता चाळ संस्कृती संपत चालली आहे. मुंबईत चाळींच्या जागी आता टोलेजंग इमारती आणि मॉल तयार झाले आहेत. यामुळे चिमण्यांचे घरटे बनवण्याचे ठिकाण उद्ध्वस्त झाले आहे. कारण पूर्वी चाळीमध्ये चिमण्यांना घरटे बनवण्यासाठी काही प्रमाणात मोकळी जागा मिळायची, मात्र आता नवीन इमारतीत चेंबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे, या ठिकाणी चिमण्यांना घरटे बनवता येत नाही. मात्र चेंबरचे प्रमाण जास्त झाल्यामुळे कबुतरांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ज्या ठिकाणी नवीन इमारती झाल्या आहेत. त्याठिकाणी कबुतर दिसून येतात. तर चिमण्या मात्र कमी झाल्या आहेत. चिमण्यांचे संवर्धन करायचे असल्यास इमारतीमध्ये काही आवश्यक ते बदल करावे लागीतल असे देखील सुनिश कुंजू यांनी म्हटले आहे.
छोटी किराणा दुकाने कमी झाली
पूर्वी जागोजागी किराणा मालाचे दुकाने दिसून यायचे. मात्र आता त्याची जागा मॉलने घेतली आहे. त्यामुळे किराणा दुकानाबाहेर जे धान्य पडायचे ते आता बंद झाले आहे. त्यामुळे चिमण्यांना अन्न मिळत नाही, परिणामी चिमण्यांची संख्या कमी होत आहे.