मुंबई -शालेय शिक्षण विभागाने आज 'राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समिती' गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तर उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू काम पाहणार आहेत. यांच्यासह एकूण २४ जणांचा या समितीत समावेश आहे. यात राज्य शिक्षण मंडळ, केंद्रीय मंडळ यांच्या प्रतिनिधींसोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, 'प्रथम' संस्थेचे प्रमुख माधव चव्हाण आदींचाही समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा...कौतुकास्पद! रायगड जिल्हा धान्य दुकानदार संघटनेतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी एक कोटींची मदत
राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांतील मुलांना समान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळवण्यासाठी बालभारती, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातील अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा घडवून आणली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये हा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समिती ही अभ्यासक्रम ठरवणार आहे. या समितीचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असल्याने पुढील कोणत्या वर्षी हा अभ्यासक्रम निश्चित होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता विभागाकडून आजच्या जीआरमध्ये देण्यात आली नाही. त्यातच या समितीच्या बैठका या आवश्यकतेनुसार घेतल्या जाणार असल्याचे नमूद केले आहे.
इतर राज्यांतील शाळांचा अभ्यास करणार...