मुंबई- राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली. यामुळे मेट्रो कारशेडचे काम थांबले आहे. या निर्णयानंतर पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला.
मेट्रो कारशेड आरे वसाहतीमध्ये होऊ नये यासाठी मोठा संघर्ष दोन महिन्यांपूर्वी उभा राहिला होता. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर कोणाला खबर लागण्याआधीच रात्रीच्या रात्री मेट्रो प्रशासनाने हजारो झाडे कापली होती. या ठिकाणी 144 कलम सुद्धा लागू करण्यात आले होते. विरोध करणाऱ्या 29 जणांना अटक केली गेली होती. आम्ही सरकारमध्ये आल्यास हे कारशेड होऊ देणार नाही, असे शिवसेनेने सांगितले होते. दिलेला शब्द हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला आहे. काल झालेल्या दुसऱ्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडला स्थगिती दिली आहे व ही स्थगिती असेपर्यंत झाडाचे एक पानही कापू देणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयानंतर पर्यावरण प्रेमींनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. परंतु, जर हा निर्णय लवकर झाला असता तर हजारो झाडांची कत्तल झाली नसती.