मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 च्या कारशेडचा वाद संपण्याऐवजी दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. आरेतून कारशेड कांजूरमार्गला नेल्यानंतर आता या जागेला भाजपाचा विरोध असून उच्च न्यायालयानेही आता कामाला ब्रेक लावला आहे. यानंतर आता आरेशिवाय कारशेडला इतर पर्याय नसल्याची चर्चा रंगू लागली आहे. पण यावरून काही पर्यावरण प्रेमी मात्र आक्रमक झाले आहेत. कांजूरमध्ये कारशेड शक्य होणार नसल्यास राज्य सरकारने कलिना आणि बीकेसीतील जागेचा पर्याय निवडावा, असे त्यांनी सुचवले आहे. मात्र काही झालं, तरी पुन्हा आरेत येऊ देणार नसल्याचा पवित्रा पर्यावरण प्रेमींनी घेतला आहे.
मेट्रो कारशेड प्रकरण : कांजूरमार्ग नको तर बीकेसी किंवा कलिनाला न्या! पर्यावरण प्रेमी आक्रमक - aarey colony metro project
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 च्या कारशेडचा वाद संपण्याऐवजी दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. आरेतून कारशेड कांजूरमार्गला नेल्यानंतर आता या जागेला भाजपाचा विरोध असून उच्च न्यायालयानेही आता या कामाला ब्रेक लावला आहे.
बीकेसी-कलिनाचा पर्याय सुरुवातीपासूनच
मेट्रो 3 चे कारशेड कुठे बंधायचे, याचा विचार प्रकल्पाचा आराखडा तयार करताना आला. त्यावेळी अनेक पर्याय संबंधित यंत्रणांकडून शोधण्यात आले. यात आरेच्या जागेला प्राधान्यक्रम देण्यात आला. पण यावेळी कांजूरमागच्या जागेचा पर्याय होता. मात्र हा पर्याय न निवडता सरकारने आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने आरेचीच निवड करत कामाला सुरुवात केली होती. मात्र त्याचवेळी जागेचा शोध घेणाऱ्या समितीने कांजूरसह बीकेसी आणि कलिनाचा पर्यायही दिला होता. पण याचा विचारच केला गेला नसल्याची माहिती 'सेव्ह आरे ग्रुप'च्या सदस्य आणि आरे कारशेड विरोधातील एक याचिकाकर्त्या अमृता भट्टाचार्य यांनी दिली आहे.
कांजूरचा पर्याय उपलब्ध न झाल्यास बीकेसी वा कलिनाचा पर्याय योग्य होईल, असे काही पर्यावरण प्रेमी म्हणत आहेत. पण त्याचवेळी काही पर्यावरण प्रेमी मात्र कांजूरच्या जागेवर ठाम आहेत. कांजूर हाच योग्य पर्याय आहे. कारण येथे केवळ मेट्रो 3 नव्हे तर मेट्रो 6, 4 आणि 14 च्या कारशेडचेही काम सुरू आहे हे विसरून चालणार नाही. कांजूरच्या जागेवर फक्त मेट्रो 3 चे कारशेड नको अशी भूमिका आता राहिल्याचे दिसत नाही. मेट्रो 3 बीकेसी, कलिनाला हलवले तरी मेट्रो 6, 4 आणि 14 च्या कारशेडचं काय? हा प्रश्न आहेच. तेव्हा कांजूर योग्य पर्याय आहे. असे असले तरी काहीही झाले तरी आरेत पुन्हा येऊ दिले जाणार नाही अशी भूमिका पर्यावरण प्रेमी झोरू बाथेना यांनी घेतली आहे. एकूणच कांजूर वा बीकेसीच्या पर्यायावर पर्यावरण प्रेमींमध्ये मतभेद आहेत. पण आरेत पुन्हा कारशेड येऊ देणार नाही यावर मात्र एकमत असल्याचे दिसते.