मुंबई- मुंबईतील गोवालिया टँक ( Gowalia Tank ) म्हणजेच ऑगस्ट क्रांती मैदान ( August Kranti Maidan ) येथे सुमारे २०० वर्षांपूर्वी वाघाचे दर्शन झाले होते. या या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी, निसर्ग सान्निध्यामध्ये त्यांना भटकंती करता यावी तसेच अन्नसाखळीतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वाघाची माहिती व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ‘वाघोबा क्लब’ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya ThackerayCabinet Minister of Tourism and Environment) यांनी केली आहे.
मुंबईत व्याघ्र दर्शनाला २०० वर्षे पूर्ण -
मुंबईतील गोवालिया टँक म्हणजेच ऑगस्ट क्रांती मैदान येथे सुमारे २०० वर्षांपूर्वी वाघाचे दर्शन झाले होते. या घटनेला आज (दिनांक ९ फेब्रुवारी २०२२) २०० वर्षे पूर्ण झाली आहेत. व्याघ्र दर्शनाच्या या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त खाकी हेरिटेज फाउंडेशन, किड्स फॉर टायगर्स आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गोवालिया टँक येथे आज बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री ठाकरे यांनी ही घोषणा केली. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे आदित्य ठाकरे यांनी निरीक्षण केले. तसेच गोवालिया टँक येथे ठेवण्यात आलेल्या वाघाच्या प्रतिकृतीचे त्यांनी अनावरण देखील केले.